
इस्लाम जिमखाना मध्ये आयोजित कार्यक्रमात सूर व्यक्त
मुंबई – सर्वसमावेशकता हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. देशातील हिंदू मुस्लिमांसह सर्वांवर ही संस्कृती टिकवण्याची जबाबदारी आहे. किंबहुना ते या वैशिष्ट्याचे संरक्षक आहेत, असा सूर इस्लाम जिमखानामध्ये आयोजित विचारवंतांच्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. सहयोग कल्चर सोसायटीतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या विचारवंतांच्या बैठकीत याबाबत विचारविनिमिय करण्यात आला.
देशाची एकता, अखंडता व सर्वसमावेशकतेच्या संस्कृतीला वृध्दींगत करण्याची गरज व्यक्त करुन त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
आयोजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. समी बुबेरे म्हणाले, समाजातील विविध धर्म-जातीच्या नागरिकांमध्ये एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या समाजात फूट घालणाऱ्या व मतभेद वाढीस लावणाऱ्या शक्ती कार्यरत झाल्या आहेत मात्र त्यापासून सावध राहण्याची व सामाजिक एकात्मतेची भावना बळकट करण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाला मार्ग दाखवण्याची ताकद असणाऱ्या विचारवंतांनी पुढाकार घेऊन सक्रिय होणे गरजेचे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी समाजाला सशक्त करण्यासाठी सर्व समाजातील बुध्दिवंत व चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजाला मार्ग दाखवण्याची गरज व्यक्त केली. सध्याच्या काळात न्यायपालिकेची जबाबदारी अधिक वाढली असून न्यायालयांवर सर्वसामान्यांचा दृढ विश्वास आहे, तो विश्वास अधिक बळकट होईल अशा पध्दतीने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. माजी न्यायमूर्ती शफी परकार यांनी देखील न्यायपालिकेने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज बोलून दाखवली.
अंजुमन इस्लामचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांनी मुस्लिम समाज व इतर समाजामध्ये सुसंवाद होण्याची गरज अधोरेखित केली. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची व एकत्रितपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
इस्लाम जिमखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अॅड युसूफ अब्राहणी यांनी सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले. मात्र हताश न होता परिस्थितीला नियंत्रणात व पूर्वपदावर आणण्यासाठी संवादाच्या माध्यमातून यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीच्या माध्यमातून अशा प्रयत्नांना सुरुवात झाल्याचे ते म्हणाले. इंडो अरब सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद अली पाटणकर यांनी देखील सुसंवादाला महत्त्व देण्याची गरज विशद केली.
यावेळी माजी सहाय्यक पोलिस आयुक्त इक्बाल शेख, सागर त्रिपाठी, माजी न्यायाधीश सलाहुद्दीन काझी, प्राचार्या जेबा मलिक, सय्यद अस्लम शाह, पंडित मुस्तफा आरिफ, नुरुद्दीव सेववाला, आर. शरीफ यांनी आपले विचार मांडले. सहयोग कल्चर सोसायटी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे सर्वांनी कौतुक केले व अशा प्रकारे अधिकाधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सध्या गरज असल्याचे मत विशद केले. समाजाचे वाढते राजकीयीकरण होणे घातक असल्याचे मत यावेळी अनेक वक्त्यांनी मांडले. बैठकीत मांडण्यात आलेल्या विचारांप्रमाणे कृती करण्यासाठी लवकरच पुढील बैठक आयोजित करण्यात येईल, आशु माहिती यावेळी डॉ. समी बुबेरे यांनी दिली.















