
कोल्हापूर, (नवनाथ मोरे) : आज राजकारणावर भांडवली अर्थकारणाचा प्रभावच नव्हे तर धाक निर्माण झाला आहे.आर्थिक मंदी हे मोठे अरिष्ट असते. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आणि अनाकलनीय मनमानी निर्णयांमुळे भारतात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.लाखोंच्या संख्येने लहान मोठे धंदे बंद पडणे,करोडो लोक बेरोजगार होणे,विकास दर खालावणे,रुपया घसरणे,रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतील तब्बल पावणे दोन लाख कोटी रुपये सरकारला वापरायला घ्यावे लागणे ही सारी लक्षणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेची आहेत.त्याकडे धोरणकर्त्यानी डोळेझाक करणे म्हणजे सर्वसामान्य जनतेला जगण्याच्या हक्कापासूनच वंचित करण्यासारखे आहे.तसे घडू न देणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आणि अग्रक्रमाचे कर्तव्य आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा एसएफआय समितीच्या एक दिवसीय युवासंवाद शिबिरात ‘आर्थिक मंदी : देशासमोरील संकट ‘ या विषयावर बोलत होते. नुकतेच हे शिबिर झाले.
जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मोरे यांनी प्रास्ताविक केले. शिबिरातील दुसरे सत्र मिलिंद इनामदार यांनी ‘ वाढती बेरोजगारी ‘या विषयावर गुंफले.प्रारंभी शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि चळवळीची गाणी सादर करण्यात आली.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले,मंदीतुन बाहेर पडायचे असेल तर आर्थिक धोरणात मूलभूत बदल अपरिहार्य आहेत.तकलादू उपाय उपयुक्त ठरणार नाहीत.देशातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावणे,पूर्ण रोजगारी तयार करणे,विषमतेचा दाह कमी करणे,कामगार-कष्टकरी यांचे जीवन सुसह्य करणे,देशाच्या मूळ व्यवसायाला अर्थात शेतीला चालना देणे गरजेचे आहे.केवळ हे संकट जागतिक आहे म्हणून चालणार नाही.तर त्यातून देशाला बाहेर काढण्याचे उत्तरदायित्व सत्ताधारी वर्गाचे आहे.अच्छे दिन,सबका विकास वगैरे कृतीतून दिसण्याची गरज आहे.सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बागुलबुवा उभा करून देश दीर्घकाळ चालवता येत नसतो.त्यासाठी जनतेला कामाची व जगण्याची हमी देणारी धोरणे राबविली पाहिजेत.प्रसाद कुलकर्णी यांनी आर्थिक मंदीच्या विविध पैलूंची सखोल मांडणी केली.
वाढत्या बेरोजगारीच्या वैफल्यातून तरुण धर्मांधता व अन्य अनिष्ट बाबींकडे वळतो आहे : मिलिंद इनामदार
दुसऱ्या सत्रात ‘वाढती बेरोजगारी ‘ या विषयावर बोलताना ज्येष्ठ अभ्यासक मिलिंद इनामदार म्हणाले,बेरोजगारीची सुरुवात सक्षम शेती धोरणाच्या अभावातून झाली आहे.आणि ती सर्व उद्योगधंद्यापर्यंत पोहोचली आहे.विकासाचे तकलादू मॉडेल फार काळ लोकांची दिशाभूल करू शकत नाही.बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे.रस्तेबांधणी,शेती,आरोग्य,शिक्षण आदी क्षेत्रांकडे रोजगार निर्मितीची मुख्य केंद्रे म्हणून लक्ष दिले पाहिजे.बेकारी ही समाजातील एक प्रकारची कीड आहे.तिचे समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे. वाढत्या बेरोजगारीच्या वैफल्यातून तरुण धर्मांधता व अन्य अनिष्ट बाबींकडे वळतो आहे.त्याची मोठी राजकीय,आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक किंमत चुकवावी लागत आहे.म्हणूनच वाढत्या बेरोजगारीला आळा घालणारी धोरणे आखण्याची गरज आहे.मिलिंद इनामदार यांनी या विषयाची सखोल व विस्तृत मांडणी केली.या शिबिरात डॉ.शरद नावरे ,शिवाजी माळी यांच्यासह जिल्हाध्यक्ष पंकज खोत, जिल्हा उपाध्यक्ष हरी आवळे, प्रमोद मोहिते, केतन पाटील, गणेश भालेराव, विनय कोळी, रत्नदिप सरोदे, आकाश मुंढे आदी उपस्थित होते. तुषार सोनुले यांनी स्वागत केले, तर प्रेरणा कवठेकर यांनी आभार व्यक्त केले.















