मुंबई, 17 मे : कोविड विरोधातील लढ्यात महाराष्ट्र सरकारला मदत म्हणून बांधकाम, खाणकाम आणि सामान हाताळणी अवजारे निर्मिती, अवजड मशिनरी निर्मिती आणि नवीकरणीय ऊर्जा सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या सॅनीने एमआयडीसीच्या माध्यमातून १ लाख एन ९५ मास्क आणि ५ लाख ३ प्लाय मास्क मदत म्हणून दिले आहेत. सॅनी दक्षिण आशिया आणि सॅनी भारताचे मॅनेजिंग डायरेक्टर दीपक गर्ग यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना ही मदत सुपुर्द केली. विविध रुग्णालये आणि बांधकामांवर काम करणा-यांना मास्क आणि पीपीई किटवाटून लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत करण्यात सॅनी आघाडीवर आहे. लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या कुटुंबांना सॅनीने धान्य वाटपही केले आहे.
दीपक गर्ग यांनी सांगितले की, ‘“सामाजिकदृष्ट्या जागरूक कंपनी म्हणून कोरोना योद्धे अर्थात डॉक्टर, नर्स, निम वैद्यकीय कर्मचारी, प्रशासनातील कर्मचारी आणि पोलिसांचे या विषाणू पासून संरक्षण व्हावे म्हणून एन 95 मास्क वाटत आहोत. कोविडचा सामना करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांचेही मला कौतुक करावेसे वाटते. मला प्रामाणिकपणे वाटते की आपला देश लवकरच कोरोनामुक्त होईल.’
राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे माननीय मंत्री राजेश टोपे यांनी मास्क दिल्याबद्दल सॅनीचे आभार मानले आणि देशातील लोकांच्या भल्यासाठी अशारितीने कार्यरत राहण्याचा सल्ला दिला.
एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन (आयएएस) म्हणाले, “या अदृश्य शत्रुचा सामना करण्यात सॅनीसारख्या कंपन्या आमच्यासोबत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. एन ९५ आणि ३ प्लाय मास्क देऊन त्यांनी ख-या आयुष्यातील आघाडीवर असलेल्या आणि धोकादायक परिस्थितीत असलेल्या वॉरिअर्सना मदत केली आहे. खबरदारीच्या उपायांचा विचार करता या लोकांच्या सुरक्षेसाठी सातत्याने त्यांना मास्क आणि पीपीई किटचा पुरवठा करत राहणे कठीण आहे. त्यामुळे अधिकाधिक कंपन्यांना मी आवाहन करतो की पुढे येऊन त्यांनी जमेल त्या रितीने मदत करावी.”