मालाड, (निसार अली) : 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त उद्या रविवारी देवनार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते दादर येथील चैत्यभूमी पर्यंत संविधान यात्रा काढण्यात येणार आहे.
यात्रेची सुरुवात दुपारी 12 वाजता होणार आहे. छत्रपती
शिवाजी महाराजांचा पुतळा, पांजरापोळ, चेंबूर नाका, सुमन नगर येथील अण्णाभाऊ साठे उद्यान, राणी लक्ष्मीबाई पार्क, महेश्वरी उद्यान, खोदादाद सर्कल, कोतवाल उद्यान, पोर्तुगीज चर्च येथील प्रबोधनकार ठाकरे यांचा पुतळा, रानडे रोडवरील सेनापती बापट यांचा पुतळा, चैत्यभूमी असा यात्रेचा मार्ग असणार आहे.
प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, विद्यार्थी नेता कन्हैया कुमार, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारीख तसेच चंद्रकांत हंडोरे, विद्या चव्हाण, प्रा. पुष्पा भावे, रामदास भटकळ यावेळी उपस्थित राहणार आहेत.
आज संविधानाने दिलेली हमी व मूल्ये धोक्यात आली आहेत. अशावेळी जनतेला संविधानातील मूल्यांप्रती सजग व क्रियाशील होण्याचे आवाहन करण्यासाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन या यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत मुंबई तसेच राज्यातील अनेक भागातून लोक सहभागी होणार आहेत. वैदू तसेच अन्य भटक्या, आदिवासी समाजातील मंडळी पारंपरिक पोषाखांत व कलांसहित सहभागी होणार आहेत.
राष्ट्र सेवा दल, संविधान संवर्धन समिती सह अनेक संस्थांचे चित्ररथ, लेझिम पथक, कलापथक या यात्रेमध्ये असणार आहेत.
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संविधान जागर यात्रा संयोजन समितीने केले आहे. चौकशीसाठी संपर्क : उमेश कदम – उपाध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, मुंबई ९९२०१५२०१६, सुरेश सावंत -संविधान संवर्धन समिती ९८९२८६५९३७.