
मुंबई, (निसार अली) : भारतीय संविधान दिनानिमित्त समविचारी संघटनाची चेंबूर पांजरपोळ शिवाजी महाराज चौक येथून शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून चैत्यभूमीपर्यंत संविधान रॅली काढली. रॅलीमध्ये दुचाकी चारचाकी वाहन तर होतेच सोबतच मोठ्या संख्येने नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते . चेंबूर ते दादर चैत्यभूमी हे मोठे अंतर पूर्ण करत वाजत गाजत व जनतेला संविधानाविषयी जनजागृती करत ही संविधान यात्रा दादर चैत्यभूमीकडे सरकत होती.
दरम्यान राष्ट्र सेवा दल मालवणीच्या वतीने सामाजिक एकात्मता या विषयावर पथनाट्य सादर केले. तब्बल चार ते पाच तासानंतर ही यात्रा दादर चैत्यभूमी येथे पोहचली व येथे सभेत रुपांतर झाले. या प्रसंगी विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार, हार्दिक पटेल, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड , कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत व इतर मान्यवरांनी सभेला समबोधित केले.















