रत्नागिरी (आरकेजी): जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची सूत्रे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांच्याकडे सोपवण्यात येऊन त्यांना बुधवारी प्रभारी अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेना पक्षांतर्गत निर्णयानुसार पत्येक पदाधिकाऱ्यांला सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी देण्यात येतो. त्यानुसार जि. प. मधील सर्व सभापती, तसेच अध्यक्ष स्नेहा सावंत यांनीही आपल्या पदांचे राजीनामे सादर केले होते. त्यामुळे अध्यक्षपदाचा पदभार उपाध्यक्षांकडे सोपवण्याचा निर्णय शिवसेना स्तरावरून घेण्यात आला. त्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार या पदाचा प्रभारी कार्यभार थेराडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या इतिहासात संगमेश्वर तालुक्याला चौथ्यांदा अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी सुभाष बने त्यानंतर राजेंद्र महाडिक, रश्मी कदम, रचना महाडिक यांच्यानंतर आता 2018 मध्ये 21 दिवसांचा कार्यभार सांभाळण्याचा मान पुन्हा संतोष थेराडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. संतोष थेराडे यांच्याकडून आचारसंहिता संपताच रखडलेल्या विकासकामांना चालना मिळेल, असे बोलले जात आहे. सर्वसमावेशक कारभारावर आपला कटाक्षाने भर राहणार आहे. जि. प. च्या विकासकार्याला गती मिळेल, असे प्रभारी अध्यक्ष संतोष थेराडे यांनी सांगितले आहे.