दरम्यान, पंतप्रधान मोदींवर सडकून टीका करताना राज म्हणाले की तुम्ही सगळ्या भारतीय जनतेचा विश्वासघात केला आहे, तुमच्याइतका खोटारडा पंतप्रधान मी बघितला नाही. इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीत. आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती तीच आजच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे हा संताप आहे. ज्याच्यावर कधी विश्वास टाकला नाही त्यांनी घात केला तर वाईट वाटत नाही. पण ज्यावर विश्वास टाकला तेच घात करत आहेत, असे सांगत त्यांनी मोदींचा समाचार घेतला. या देशाने इतके प्रेम दिले, विश्वास टाकला त्यांच्यासाठी तुम्ही काय केलेत, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. यावेळी नितीन गडकरीवरही त्यांनी शरसंधान साधले. ‘अच्छे दिन म्हणजे गळ्यात अडकलेले हाडूकच’ असा संदर्भ देत अच्छे दिन येणारच नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केले. सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणूनच त्यांचे खात बदलून त्यांच्या जागी पियुष गोयल यांची वर्णी लावली. मात्र या गोयलांना काय कळतं रेल्वेचं. या गोयलांच्या पियूषपेक्षा आमच्या दादरच्या आस्वाद, प्रकाशचा पियूष बरा, असे सांगत केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांची खिल्ली उडवली.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन केवळ मुठभरांसाठी आणली जात आहे. त्याकरीता लाख कोटीचे कर्ज काढणार आणि अख्खा देश हे कर्ज फेडत बसणार, हे चालणार नाही. मुंबईतल्या मूठभर व गुजरातमधल्या मुठभर गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेनचा डाव असून मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे, हा डाव हाणून पाडू असा इशारा राज यांनी दिला.
माझा व्यक्ती म्हणून मोदींना विरोध नाही…पण त्यांच्या भूमिकांना विरोध आहे, आधी वेगळे बोलत होते आता मोदींची भाषा बदलली आहे. तुमच्याशी आमचं घेणदेण नाही. तुमच्या चुकीच्या भूमिकांना विरोध आहे. बुलेट ट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले आहेत. सुरेश प्रभूंनी बुलेटट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढून टाकलं. फक्त २-३ माणसं देश चालवणार का? सर्व संपादकांना माझी विनंती आहे की या सरकारला वठणीवर आणा, न्यायालयांसह सर्व संविधानिक संस्थांना माझी विनंती आहे की दबावाखाली निर्णय घेऊ नका, देशातल्या घराघराचा कानोसा घ्या या; लोकं सरकारला शिव्या घालताहेत, देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत, असा सवाल ठाकरे यांनी केला. दरम्यान चर्चगेट- मेट्रो परीसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावर वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच, असे ही ते म्हणाले.
रतन टाटांच्या सांगण्यावरून मी गुजरातेत गेलो, परंतु आता कळतंय तो मुखवटा होता. खरा विकास झालेला नाही. भाजपामधले लोकपण हा सगळा खोटा मुखवटा असल्याचे खासगीत सांगत सुटले असून विकास वेडा झालाय हे ही भाजमधूनच आलेले घोषवाक्य असल्याचे राज म्हणाले. दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून संताप मोर्चाची सांगता करण्यात आली.
दादा कोल्हापूरला जायचे वांदे करू – संदीप देशपांडे
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन होणारच, असे विधान राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले होते. मनसेचे सरचिटणीस व प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दादांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. दादा तुम्ही बुलेट ट्रेनचे सोडाच, नाहीतर तुम्हाला कोल्हापूरला जायचे वांदे करू, हे राज ठाकरे यांच्या मनसे कार्यकर्त्याचे आवाहन आहे, असा इशारा देशपांडे यांनी दिला. यानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्या वाजवून मनसैनिकांनी दाद दिली.