मुंबई, दि. ३० – महापालिकेच्या जी दक्षिण वॉर्ड येथील संत गाडगेबाबा उद्यान चौक (सात रस्ता) येथे विविध नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामांचे आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
लवकरच या ठिकाणी पदपथ तसेच लोकांसाठी बसण्याची सोय, महालक्ष्मी पूल ते बी. जे. मार्गाला जोडणारा थेट रस्ता, पथदिवे, सीसीटीव्ही या सुविधांसोबतच सुशोभीकरणाच्या अनुषंगाने महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. पदपथांमुळे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करणे सुलभ होणार आहे. भविष्यात इथे सौरउर्जा वापर व पर्जन्य जलसंकलनही केले जाईल. या प्रकल्पासाठी नगरविकास विभागातर्फे आर्थिक सहाय्य मिळणार असून त्याबद्दल मंत्री श्री. ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री सचिन अहीर, नगरसेवक आशिष चेंबुरकर, माजी आमदार सुनिल शिंदे, मनपा सहायक आयुक्त शरद उघडे आदी मान्यवर उपस्थित होते. रचना संसद आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वास्तुविशारदांचे या कामामध्ये सहकार्य लाभत आहे.