मुंबई : सतराव्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवाला रवींद्र नाट्य मंदिरात आजपासून उत्साहात सुरूवात झाली. ‘दशक्रिया’ या चित्रपटाने या महोत्सव सुरू झाला.
चित्रपट विभागातील अंतिम निवड फेरीत एकूण ११ चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली. ज्यात घुमा, कासव, नाती खेल, माचीवरला बुधा, व्हेंटीलेटर, हाफ तिकीट, दशक्रिया, वजनदार, गुरु, पोस्टर गर्ल, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटांचा समावेश आहे.
रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विभागातील कलाकृतींचा आणि कलावंतांचा सन्मान करणा-या या पुरस्कार सोहळ्यात सामान्य रसिकांना माफक ५० रुपये दरात हे चित्रपट पाहता येत आहेत. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे गुरु, पोस्टर गर्ल आणि किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी हे तीन चित्रपट या महोत्सवात दाखविले जाणार नाहीत. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना महोत्सवामध्ये दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटातील कलाकार मंडळींसोबत चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली असून, परीक्षकांसोबत मतदान करण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे.
चित्रपट विभागांसाठी सन्माननीय परीक्षक म्हणून,मिलिंद गवळी, अमित भंडारी, रमेश मोरे, राजीव पार्सेकर, सुशांत शेलार आणि समृद्धी पोरे यांनी धुरा सांभाळली आहे. या सर्व मंडळींनी देखील महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात विशेष उपस्थिती लावली होती. चित्रपट विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम दीड लाख रुपये बहाल केले जाणार आहेत. दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित तसेच इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जाणार असल्याचे, संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक चंद्रशेखर सांडवे व अध्याक्षा अर्चना नेवरेकर यांनी सांगितले.
दिनांक | चित्रपटांची नावे | वेळ |
१८ एप्रिल २०१७ | दशक्रिया | दुपारी २. ०० वा |
१८ एप्रिल २०१७ | व्हेंटीलेटर | दुपारी. ४ . 3० वा. |
१८ एप्रिल २०१७ | नाती खेल | रात्री ७.०० वा. |
१८ एप्रिल २०१७ | वजनदार | रात्री ९.3० वा |
दिनांक | चित्रपटांची नावे | वेळ |
१९ एप्रिल २०१७ | माचीवरला बुधा | दुपारी २ ०० वा |
१९ एप्रिल २०१७ | घुमा | दुपारी ४. ३० वा. |
१९ एप्रिल २०१७ | कासव | रात्री ७..०० वा. |
१९ एप्रिल २०१७ | हाफ तिकीट | रात्री ९.3० वा |