
मुंबई : संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याने सतराव्या वर्षात पदार्पण केले आहे. यावर्षी झालेल्या चित्रपट विभागातील अंतिम निवड प्रक्रियेत एकूण ११ चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे सर्व चित्रपट प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात १८ आणि १९ एप्रिलला १७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवामध्ये दाखवले जाणार आहेत.
घुमा, कासव, नाती खेल, माचीवरला बुधा, व्हेंटीलेटर, हाफ तिकीट, दशक्रिया, वजनदार, गुरु, पोस्टर गर्ल, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या अंतिम ११ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ज्यात गुरु, पोस्टर गर्ल आणि किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी हे तीन चित्रपट काही तांत्रिक कारणास्तव दाखविले जाणार नाहीत.
चित्रपट महोत्सवाची सुरुवात ‘दशक्रिया’ या चित्रपटाने होणार आहे. सारे चित्रपट रसिकांना ५० रूपये या माफक दरात पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतींच्या कलाकार मंडळींसोबत खेळ पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळत असून परीक्षकांसोबत मतदान करण्याची संधी देखील प्राप्त होणार आहे.
चित्रपट विभागांसाठी परीक्षक म्हणून,मिलिंद गवळी, अमित भंडारी, रमेश मोरे, राजीव पार्सेकर, सुशांत शेलार आणि समृद्धी पोरे यांनी धुरा संभाळली. एकूण ४७ चित्रपटांपैकी अंतिम ११ चित्रपटांची निवड करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. या विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लाख रुपये असणार आहे. तसेच दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह बहाल करण्यात येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक चंद्रशेखर सांडवे व अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी माहिती दिली,