नवी दिल्ली : प्रत्येक संघटनेत, विशेषत: राष्ट्रीय सुरक्षेशी थेट संबंध असणाऱ्या संरक्षणासारख्या क्षेत्रात स्वदेशीकरणावर अधिकाधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले. भारतीय लष्कराच्या स्वदेशी तंत्रज्ञानविषयक सक्षमीकरणासंदर्भात आयोजित एका चर्चासत्राचे उद्घाटन करतांना ते आज बोलत होते.
संरक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वच भागधारकांनी स्वदेशीकरणावर भर द्यावा आणि भविष्यातील प्रत्येक उपक्रमात ‘मेक इन इंडिया’ चळवळीचा समावेश असेल, याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. आपल्या रोजच्या आयुष्यातील तंत्रज्ञान हा अविभाज्य घटक झाला आहे. संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण असणे आवश्यक असून, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते सहज शक्य होऊ शकेल, असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला. संरक्षण मंत्रालय विशिष्ट प्रकल्पांसाठी तंत्रज्ञानसंबंधी विकास निधी उपलबध करुन देत असल्याचे त्यांनी सांगितले.
या चर्चासत्रात लष्कर प्रमुख बिपीन रावत तसेच फिक्कीचे सरचिटणीस संजय बाळु यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.