मुंबई : राज्यातील दिन दुबळ्या गरीब, मागासलेल्या आणि अल्पसंख्यांक समाजासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती तळागाळातील लोकांना मिळावी आणि त्याचा त्यांना लाभ घेता यावा यासाठी सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक विभागामार्फत “सन्मान संवाद” रथ यात्रेस विधानभवन, मुंबई येथून सुरुवात करण्यात आली.
सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक विभागामार्फत आयोजित केलेल्या “सन्मान संवाद” रथ यात्रेचा प्रारंभ सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील,अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे उपस्थित होते.
समाजातील मागास दुर्बल, अल्पसंख्यांक लोकांच्या विकासासाठी तसेच त्यांची उन्नती होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत “सन्मान संवाद” रथ यात्रेच्या माध्यमातून खेडोपाडी जावून लोकांना समजेल अशा स्वरुपात माहिती देणे आणि त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळून देणे हा या रथ यात्रेचा मुख्य उद्देश असणार आहे. ही यात्रा विधानभवन मंबई येथून सुरु होऊन पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या मार्गाने जाणार असून पावसाळ्यानंतर उर्वरित भागात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.