
मुंबई, 12 सप्टेंबर 2025 : भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच, ये डर अच्छा है, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचले आहे. नेपाळमधील तरूणांनी क्रांतीचा मार्ग दाखवला. भ्रष्ट शासन कर्त्यांना रस्त्यावर आणले. भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच, असे राऊत यांनी म्हटले आहे.
नेपाळमध्ये निर्माण झालेली अराजकता आणि हिंसक आंदोलनाची परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते. सावध राहा, असा इशारा देणारे ट्विट राऊत यांनी गुरुवारी केले . यामुळे शिंदे गटाने शुक्रवारी राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवर प्रत्युत्तर देताना राऊत यांनी एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली. त्यात महाराष्ट्र आणि देशात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नेपाळी तरुणांचा लढा भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरुद्ध आहे, असे मी सांगताच महाराष्ट्रात मिंधे गटाने माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली. हे लोक घाबरले आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.














