ठाणे (विएम): उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना मानद “कमांडर” ही पदवी प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट जनरल समन्वार व पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते मान – अभिमानाचा लष्करी वेष देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे व प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ही सन्मानित करण्यात आले.
सैनिक शाळेत शिक्षण घेतले पण लष्करात दाखल होऊन देशसेवा करता आली नाही. राष्ट्रीय सैनिक संस्थेने मला कमांडर या पदवीने सन्मानित केल्याने माझी ईच्छा पूर्ण झाली. या गणवेशाचा आणि सन्मानाचा मान राखून सुरु असलेले देशकार्य अखंडित सुरु ठेवीन अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सह्याद्री प्रतिष्ठान व राष्ट्रीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड येथे १९७१ भारत – पाक युद्धाच्या विजय दिन स्मृती समारंभ आयोजित करण्यात आला होता.
१९७१ भारत – पाक युद्धात विशेष पराक्रम करणारे जवान, अधिकारी व त्यांच्या वीरपत्नी अशा एकूण २० जणांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱयांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन आणि अमर जवानांच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र समर्पण, राष्ट्रभक्तीपर गीते आदी कार्यक्रमामुळे या समारंभाला विशेष गांभीर्य प्राप्त झाले.
दरवर्षी १६ डिसेंबर हा “विजय दिन” म्हणून साजरा केला जातो. या वर्षी प्रथमच वरील तिघांचा मानद “कमांडर” पदवीने बहुमान करण्यात आला व त्यांना सन्मान कमांडरचा युनिफॉर्म प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र संचालन सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे यांनी केले. आपल्या सूत्र संचालनाच्या अदाकारीने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.