रत्नागिरी : राजापूर अर्बन को.आँप.बँक लि.राजापूरच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय ओगले, तर उपाध्यक्षपदी भाजपचे अनिलकुमार करंगुटकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. बँकेवर काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलची एकहाती सत्ता असल्याने या दोघांचीही बिनविरोध निवड झाली.
सहकार पॅनलने निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे अध्यक्ष इब्राहिम बलबले आणि उपाध्यक्ष विजय पाध्ये यांनी आपली एक वर्षाची मुदत संपल्याने आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. ही निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेतृत्व अजित यशवंतराव यांचे कट्टर समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राजापूर नगरपरिषदेचे नगरसेवक संजयजी ओगले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अजित यशवंतराव मित्र मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भरत लाड, तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार, जि.प.सदस्य आबा आडिवरेकर, पं.स.सदस्य प्रतिक मटकर, तालुका उपाध्यक्ष सिदार्थ जाधव सर, सरचिटणीस सुनिल जाधव, संचालक प्रसाद मोहोरकर, सरपंच महेश करगुंटकर, मागासवर्गीय सेल लांजा तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के, युवकचे मनोहर गुरव, एजाज बांगी, गौतम जाधव, महेश राडी, अजित यशवंतराव मित्र मंडळाचे मंदार सप्रे, सलमान देवानी, सौरभ कानडे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.