
रत्नागिरी, (आरकेजी): संगमेश्वर तालुक्यात तापाच्या साथीने 4 दिवसांत 4 बळी घेतले आहेत. गेल्या तीन दिवसात तीन बळी घेणाऱ्या तापाच्या साथीने तालुक्यात शुक्रवारी चौथा बळी घेतला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
गेले काही दिवस तापाच्या साथीने थैमान घातलं आहे. तालुक्यात 150 हून अधिक तापाचे रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र दिवसेंदिवस हा आकडा वाढतच जात आहे. गेल्या तीन दिवसात तुषार पातेरे(18, साडवली), ऋषिकेश दामुष्टे (17, मुरादपूर), मृणाली सावंत (12, देवरुख) या तिन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. केवळ एक – दोन दिवस आलेल्या तापाने या तिघांचा बळी गेला असताना आरोग्य यंत्रणेने अजूनही हा विषय गांभीर्याने न घेतल्याने शुक्रवारी तापाचा चौथा बळी गेला आहे. संतोष लक्ष्मण झेपले (३७ / पुर , वरची झेपलेवाडी ) यांचा आज मृत्यू झाला आहे. झेपले यांना सलग तीन दिवस ताप येत होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र आज चौथ्या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
दरम्यान लागोपाठ तीन बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने एक आपत्कालीन पथक तैनात केले असुन त्यांच्या मार्फत घरपट सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. ताप आलेल्या रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असले तरी हा ताप नेमका कोणत्या प्रकारचा आहे याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमात आहेत. त्यामुळे हा जीवघेणा ताप नेमका कोणता आणि त्यावर उपाय तरी काय याची माहिती आरोग्य विभागाने जाहीर करावी अशी मागणी आता होत आहे.















