संगमेश्वर : समाज प्रबोधन शिक्षण संस्था संचालित डॉ. र. दि. गार्डी माध्यमिक विद्यालय,कळंबस्ते,वाडेवेसराड , संगमेश्वर, रत्नागिरी या शाळेच्या आवारात एस.एस. सी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. शाळेचे संस्थापक वि. ल. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
इतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन
करोना महामारी दरम्यान माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. दळी सर यांनी अथक प्रयत्नाने शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रत्येक गावात आपल्या सहकारी शिक्षक यांच्या सहाय्याने तेथील गावातील विद्यार्थ्यांना एकत्र करून गावातील मंदिर यांच्या आवारात अभ्यासक्रमाचे वर्ग घेतले. सर्वांना शिकवणी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील प्रमुख व्यक्तींचे त्यांना सहकार्य लाभले. त्यांच्या या परिश्रमामुळे शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. याचे संपूर्ण श्रेय दळी सर तसेच त्यांचे सहकारी शिक्षक यांना जाते. केवळ आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न करता इतर शाळेतील विद्यार्थ्यांना एकत्र करून मार्गदर्शन करण्यात आले, असे यावेळी सांगण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मार्च 2020 , 2021, 2022 या कालावधीमध्ये प्रथम आलेले तीन विद्यार्थी यांचा शाळेतर्फे रोख रक्कम व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
समाज प्रबोधन शिक्षण संस्था संचालित डॉ. र. दि. गार्डी माध्यमिक विद्यालय, या संस्थेचे सभासद मंडळ वि.ल.मोहिते संस्थापक, यशवंत जाधव (सरचिटणीस), डॉ.अरुण मोहिते ,शांताराम मोहिते ,अशोक कांबळे ,ए डी. पवार, नीलिमा जाधव ,ज. भा. कदम ,प्रकाश एच. कांबळे ,तसेच मुख्याध्यापक -दळी प्रमोद मनोहर सर, जाधव अ.गो., श्री सौंदलगे नुरोद्धीन ,तांबे दिलीप , सौ. दळी प्रियांका व सुनील मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा झाला.
या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना विशाखा विष्णू मोहिते यांच्या नावे वि .ल. मोहिते यांनी, प्रकाश खरात यांच्या नावे विजया खरात तसेच चंद्रप्रभा तुकाराम जाधव ( ताम्हणकर) यांच्या नावे इन्स्पेक्टर मिलिंद जाधव यांनी स्मृती प्रित्यर्थ रोख रक्कम तसेच सन्मानपत्र विद्यार्थ्यांना दिले.
या कार्यक्रमांतर्गत मिलिंद कडवईकर ( समुपदेशक एसएससी बोर्ड) यांनी महत्त्वपूर्ण माहिती देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कशी करावी तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोण कोणत्या शाखा आहेत यासंदर्भात मार्गदर्शन केले. कडवई सरांचे आभार संस्थेच्या वतीने मानण्यात आले.