रत्नागिरी, ( आरकेजी) : राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी, यामागणीसाठी विरोधकांनी सुरू केलेली संघर्षयात्रा उद्या रायगड आणि रत्नागिरीत येत आहे. यात्रेचा हा चौथा टप्पा असून समारोप १८ मे रोजी सिंधुदुर्गात होणार आहे.
उद्या सकाळी रायगड किल्ला येथून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशिर्वाद घेऊन संघर्ष यात्रेला सुरुवात होईल. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याच्या हक्कासाठी लढा दिला त्या महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन त्या ठिकाणी विरोधी पक्षांचे नेते पत्रकारांशी संवाद साधतील. पुढे रत्नागिरी येथे प्रवास करत खेड तालुक्यातल्या भरणे इथे यात्रा पोहोचेल. दुपारी दोन वाजता चिपळूण तालुक्यातील सावर्डे इथे सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षातील आणखी काही नेते या संघर्ष यात्रेत सहभागी होतील.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.