मुंबई : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०१६-१७ चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार व नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठातील पाटकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार चंद्रकांत ऊर्फ चंदू डेगवेकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी रामदास कामत यांच्या हस्ते तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार लीलाधर काबंळी यांना ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कलाकार विजू खोटे उपस्थित होते.
संगीत नाटक उर्जितावस्थेत आणण्यासाठी काळानुरुप बदल करण्याची गरज आहे. रसिकांनी आता वेगऴ्या प्रकारची संगीत नाटके स्वीकारण्याची आवश्यकता आहे. संगीत नाटयभूमीला पुर्वीसारखे गौरव प्राप्त करुन देण्यासाठी जे बदल करावे लागतील त्यासाठी राज्य सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे व त्यांना सर्वतोपरी मदत करील, तसेच संगीत रंगभूमी आणि नाटय रंगभूमीला जे सहकार्य हवे हे आहे ते शासन देण्यासाठी कटीबध्द असल्याचे आश्वासन तावडे यांनी शनिवारी येथे दिले.
गेल्या ३५ वर्षाच्या काळात आपण जी मराठी रंगभूमीची सेवा केली त्या कलेचे चीज झाल्याची भावना पुरस्कारार्थी लिलाधर कांबळी यांनी व्यक्त केली. तर अनेक जुन्या नव्या दिग्दर्शकांकडून माझ्यावर संस्कार झाले, म्हणूनच आपण आपला प्रवास इथपर्यंत करु शकलो असे मनोगतही रंगकर्मी चंद्रकांत डेगवेकर यांनी व्यक्त केले.