डोंबिवली, (प्रशांत जोशी) : सर्व प्रकारच्या दु:खात संगीत हे मानवाला आधार देत असते. संगीत साधनेतून लोकांना ज्ञान देत आपल्या दु:खातून मार्ग काढणारे आपण आहात, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायिका डॉ .अश्विनी भिडे-देशपांडे यांनी कल्याण येथे केले.
रविवार दि. २६ आँगस्ट रोजी गायन समाज कल्याण येथे निस्सीम संगीत प्रेमी स्वर्गीय किन्नरी जोशी प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्वरांजली कार्यक्रम आणि कल्याण गायन समाज संचालित म्हैसकर कला अध्यासन प्रकाशित डॉ. आशा पारसनीस जोशी रचित आलाप तान सहित बंदिशींचे ‘स्रुजन ३’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी अ.भा.गां. मंडळाचे सचिव पांडुरंग मुखडे, गायन समाजाचे अध्यक्ष डॉ. संदिप जाधव, राम जोशी, आशा पारसनीस जोशी उपस्थित होते.
‘स्रुजन ३’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ अश्विनी भिडे देशपांडे व अ.भा.गांधर्व मंडळाचे सचिव पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गायन समाजाचे अध्यक्ष डॉ. संदिप जाधव यांनी स्वर्गीय किन्नरी जोशी हिच्या संगीत प्रेमा विषयी व इतर आठवणी सांगितल्या. स्वर्गीय किन्नरीला श्रद्धांजली म्हणून डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे सुश्राव्य गायन झाले.