रत्नागिरी, (आरकेजी): पक्षांतर्गत वादामुळे आता संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकारणीत मोठे बदल होण्याची चिन्ह आहेत. अलिकडेच रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकारणीत फेरबदल करण्यात आले होते. त्यानंतर आता संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकारणीत मोठे फेरबदल होणार आहेत. यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या बाबतचे निर्णय हे खासदार विनायक राऊत हे घेणार आहेत.
रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूणप्रमाणेच संगमेश्वर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकेकाळी हा स्वतंत्र विधानसभा मतदार संघ होता. मात्र संगमेश्वर सध्या तीन विधानसभा मतदार संघामध्ये विभागला गेला आहे. या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजेच राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये शिवसेनेचेच आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संगमेश्वरला चांगलंच महत्व असतं. पण गेल्या विधानसभा निवडणुकीपासून संगमेश्वरमधल्या शिवसेनेत अंतर्गत कुरबुरी सुरु झाल्या आहेत. त्या निवडणुकीत एका गटाने तर आमदार सदानंद चव्हाण यांच्याच विरोधात काम केलं होतं. तेव्हापासून संघटनेत अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. जुन्यांना संधी देण्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना संधी देत तालुका संघटनेला नवीन रूप देण्याची मागणी एका गटाची आहे. यानुसार तालुका कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येणार असल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे. तालुकाप्रमुख पदासह अन्य पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू झाली आहे.
सध्या प्रमोद पवार हे संगमेश्वरचे शिवसेना तालुकाप्रमुख आहेत. गेली २० वर्षे ते तालुकाप्रमुख आहेत. तालुक्यातले मातब्बर नेते ज्यावेळी शिवसेना सोडून गेले, त्यावेळी तालुक्यात शिवसेना वाचविण्यासाठी प्रामोद पवार यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पण आता तालुकाप्रमुखहि बदलण्यात येणार असल्याची चिन्ह आहेत.
संगमेश्वर तालुका शिवसेनेत बदल करण्याचे अधिकार हे आमदार सदानंद चव्हाण तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्याकडे आहेत. मात्र त्यावर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार खासदार विनायक राऊत यांच्याकडे देण्यात आल्याने आगामी काळात संघटनेत बदल होणार का आणि कोणकोणत्या नवीन चेहर्यांना कार्यकारिणीत संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.