
आज 11 जून साने गुरुजी यांचा स्मृतिदिन. त्या निमित्त ज्येष्ठ पत्रकार नासिकेत कृष्णकांत पानसरे यांनी लिहिलेला लेख
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे :
साने गुरुजी यांची आज ७६ वी पुण्यतिथी.साने गुरुजी यांनी मुंबईत ११ जून १९५० रोजी के.ई.एम.रुग्णालयात २१ झोपेच्या गोळ्याचे अतिसेवन करून आत्महत्या केली.माझी आई गांधीवादी कै.तरुलता कृष्णकांत राजेशिर्के- पानसरे ही साने गुरुजींच्या साहित्यावर प्रेम करणारी होती.तिच्या अप्रकाशित साहित्य व कविता यांचा खजिना माझ्याकडे आहे.माझी आई स्वर्गात गेल्यानंतर तिची कवितांची वही माझ्या वाचनात आली.त्यामध्ये तिने असे लिहिलेले होते की ज्या दिवशी साने गुरुजींनी आत्महत्या केली होती.त्याच दिवशी तिची आई म्हणजे माझी आजी कॅन्सरच्या आजाराने तिला सोडून गेली होती.याबाबत लिहिताना ती म्हणते की दोघेही बहिण भाऊ स्वर्गात एकमेकांना भेटले असतील.काय ही तिची भाबडी कल्पना.मी ही तरुणपणी वैफल्यग्रस्त जीवन जगत असताना तासनतास स्वतःला एका खोलीत कोंडून घेत असे पण ती मला कधी रागावली नाही.एवढच म्हणायची तू साने गुरुजींसारखी आत्महत्या केलेली मला आवडणार नाही.मग मी त्यापासून परावृत्त होत असे.पण मी माझ्या एकुलती एक मुलगी धरती.हिला समजावू शकलो नाही.ती वैफल्यग्रस्त जीवन जगत असताना मला नेहमी म्हणायची पप्पा मला आत्महत्या करावीशी वाटते.मी तिला नेहमी म्हणायचो की तूला मरण आले तरी ठिक.त्यातून तूला अपंगत्व आले तर तू काय करशील.मी तिला माझ्या आईने मला नेहमी दिलेला उपदेश सांगत असे.पण तिने माझे ऐकले नाही.आणि तिने मोठे धाडस केले.आणि ती मला या दुनियेतून सोडून गेली.आणि आयुष्यभराचे दु:ख आम्हा उभयतांना पती पत्नीना देऊन गेली.गुरुजींची आत्महत्येच्या निर्णयामागे वैयक्तिक दुःख आणि राजकीय सामाजिक निराशा ही कारणे असली तरी गांधीहत्येमुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता.आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीची चिंता त्यांना होती. माझी गांधीवादी आईनेही महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर १० ते १२ दिवस अन्नपाणी सोडले होते.गांधीची हत्या ज्या दिवशी झाली तो शुक्रवार होता.हा दिवस मरेपर्यंत तिने उपवास केला.तीची ईच्छा होती की मला शुक्रवारी मरण यावे,ती १७ आॕगस्ट १९८९ रोजी शुक्रवार होता.या दिवशी ह्रदयविकाराच्या झटक्याने मला सोडून गेली, माझ्या आईने गांधीचा शुक्रवार तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बुधवार मरेपर्यंत उपवास केला.साने गुरुजी या नावाशी माझा नेहमी संबंध राहिला आहे.माझी पानसरे नावाची बिल्डिंग चिंचपोकळी येथील आर्थररोड नाक्यावरील साने गुरुजी मार्गावर आहे.त्यामुळे वयाच्या ३३ वर्षांपर्यंत घरचा पत्ता लिहिताना मी साने गुरुजी मार्ग असे लिहित असे.माझे प्राथमिक शिक्षण आर्थररोड नाक्यावरील मुंबई महानगर पालिकेच्या साने गुरुजी प्राथमिक शाळेत झाले याचा उल्लेख येथे करावसा वाटतो.आता जाणून घेऊ या साने गुरुजी यांची माहिती.साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला.त्यांचे नाव पांडुरंग सदाशिव साने.आईचे नाव यशोदाबाई तर वडीलांचे नाव सदाशिव.साने गुरुजींची कर्मभूमी खान्देशची अमळनेर येथील.तेथील तत्वज्ञान मंदिर आणि प्रताप विद्यालयात त्यांनी अध्यापन केले.त्यांनी न्यू पूना काॅलेजमधून मराठी आणि संस्कृत विषयात एम.ए.पदवी पर्यंत शिक्षण घेतले होते.ते एक महाराष्ट्रातील एक थोर स्वातंत्र्यसेनानी, संवेदनशील साहित्यिक,शिक्षक आणि समाजसुधारक होते.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सहभाग होता.१९३० घ्या सविनय कायदे भंग चळवळीत त्यांनी भाग घेतला.त्यासाठी त्यांना अनेक वर्ष तुरुंगावास भोगावा लागला.तुरुंगात असताना त्यांनी बहुतांश साहित्य लिहिले.धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती,गोड गोष्टी,सुंदर पत्रे हि त्यांची प्रमुख पुस्तके.त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली.त्यातील बहुतांश पुस्तके मुलांसाठी आहेत.श्यामची आई सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय पुस्तक.संपादक, नाटककार,वक्ते, चित्रपट निर्माते आचार्य अत्रे यांनी त्यांच्यावर श्यामची आई चित्रपट बनविला.ज्याला१९५४ साली राष्ट्रीय पुरस्कारांच्या पहिल्या यादीत राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळाले.गुरुजींनी आईच्या स्मृती श्यामची आई मध्ये शब्दबद्ध केल्या आहेत.श्यामच्या आई मधील श्याम म्हणजे स्वतः साने गुरुजी होय.गुरुजींवर त्यांच्या आईच्या शिकविणूकिचा व संस्कारांचा मोठा प्रभाव होता.तरुणांमध्ये देशभक्ती आणि समाजसेवा रुजवावी यासाठी त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली.आंतरभारती चळवळ सुरु केली.समतावादी विचार ते अस्पृश्यता निवारण आणि सर्वधर्मसमभावचे ते कट्टर समर्थक होते.त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी आणि मानवी मुल्यांसाठी सर्मपित केले.त्यांचा पत्री हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.या काव्यसंग्रहातील खरा तो एकची धर्म.जगाला प्रेम अर्पावे.आजही हि कविता महाराष्ट्रातील शाळांमध्ये प्रार्थना म्हणून गायली जाते.आजच्या मोबाईलच्या युगात प्रत्येक आईवडीलांनी वेळ काढून लहान मुलांना साने गुरुजींचे साहित्य वाचून दाखवली पाहिजे असे मनोमन वाटते.गुरुजींना स्मृती दिनानिमित्त भावपुर्ण आदरांजली अर्पण करतो.
नासिकेत कृष्णकांत पानसरे
ज्येष्ठ पत्रकार,
मुंबई















