रत्नागिरी : रत्नागिरीत पावसाचा जोर रविवारपासून मंदावला असला तरीही अमावस्येच्या पार्श्वभूमीवर समुद्र मात्र उधाणलेला आहे. सोमवारी सकाळपासूनच मोठ्या भरतीने किनारपट्टीलगतचे नागरिक चिंतेत आहेत. मिर्या पंधरामाड-अलावा दरम्यान लाटांच्या जोरदार तडाख्याने येथील धुपप्रतिबंधक बंधार्याची वाताहात उडून मोठी भगदाडे पडल्याचे समोरे येत आहे.
रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाबाबत खबरदारीचा इशारा प्रशासनस्तरावरून आधीच देण्यात आला होता. गेले चार दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. दरम्यान मंगळवार 2 जुलै रोजी अमावस्या असल्याने समुद्राला मोठी भरती येणार आहे. मात्र अगोदरपासूनच समुद्र उधाणलेला असल्याने किनार्यालगत राहणार्या नागरिकांना प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
किनारपट्टीवर ‘हायटाईड’ चा इशाराही देण्यात आलेला आहे. उधाणामुळे उंचच उंच लाटा कोकण किनारपट्टीवर येऊन धडकत आहेत. अमावास्येच्या पार्श्वभूमीवर लाटांचा जोर वाढलेला असून समुद्राचे आणखी रौद्र रूप मंगळवारी पहायला मिळणार आहे. रत्नागिरीतील पंधरामाड ते अलावा येथील नागरिकांना खबरबदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येथील किनाऱयाला वेळोवेळी उधाणाच्या भरतीमुळे तडाखा बसतो. लोकवस्तीच्या संरक्षणार्थ या किनार्यावर धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आलेला आहे. पण हा बंधारा उधाणाच्या लाटांपुढे तग धरू शकत नसल्याची स्थिती निर्माण झालेली आहे.