रत्नागिरी : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सीमा बंद झाल्याने मुंबईतील चाकरमान्यांनी आपल्या गावी येण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर केला. गेल्या दोन दिवसात मच्छीमारी नौकांवरुन गावी आलेल्यांची संख्या 50 हून अधिक आहे. त्यामुळे समुद्रमार्गे येणार्यांना रोखण्यासाठी आता समुद्रगस्त सुरु करण्यात आली आहे.
सागरी किनाऱ्यांवर 24 तास गस्त घातली जात आहे. कस्टम, पोलिस, मत्स्यविभाग अशा सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून समुद्रात हि गस्त घालण्यास सुरवात झाली आहे.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर, कोंडकारुळ, रत्नागिरी तालुक्यातील वरवडे व अन्य काही गावांमध्ये या आठवड्यात समुद्रमार्गे चाकरमानी आले आहेत. यातील काहीजण मोठमोठ्या मच्छीमार नौकांवर कामाला आहेत. या नागरिकांना गावात आणून सोडणार्या बोट मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समुद्र मार्गे प्रवास करुन आणखी लोक येण्याची शक्यता लक्षात घेता, समुद्रात गस्त सुरु करण्यात आली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार फिनोलेक्स कंपनीने समुद्र गस्तीसाठी खास टग बोट उपलब्ध करून दिली आहे.
त्यानुसार प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरीचे एन. व्ही. भादुले, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जे. डी. सावंत, सहाय्यक बंदर निरीक्षक सुहास गुरव यांच्यासोबत मुंबईहून रत्नागिरी मध्ये समुद्रमार्गे होणार्या अवैद्य प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष गस्ती अभियान सुरु करण्यात आले आहे.