दिल्ली : खासदार संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद याची भेट घेतली. तसेच त्यांनी राष्ट्रपतींना छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षि शाहू महाराज यांचे इंग्रजी मधील चरित्र सदिच्छा म्हणून भेट देवून विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली.
लोकप्रतिनिधींनी युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे राष्ट्र व समाजहिताचे कार्य सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून विविध माध्यमातून समाजातील घटकांपर्यत पोहचविणे आवश्यक आहे असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले. राजर्षि शाहू महाराजांच्या १०० वर्षापूर्वीच्या समाज सुधारणांच्या धोरणांवर चर्चा केली. सध्याच्या सरकारी धोरणांमध्ये राजर्षि शाहू महाराजांचे विचार व प्रगतीची धोरणे आजही कशी उपयुक्त ठरतात यावर ही सविस्तर चर्चा केली. आरक्षणाचे जनक राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये १०० वर्षापूर्वी बहूजन समाजासाठी दिलेले आरक्षण व त्याची सध्या असलेली काळाची गरज तसेच राजर्षि शाहू महाराजांनी केलेल्या विविध कार्यांवर चर्चा करण्यात आली.