मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती अर्थात ज्ञान दिनानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल असा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या राज्यभरात एकाच वेळी या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.यासंबंधीची घोषणा त्यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात पत्रकारांसमोर केली. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दाखवलेल्या मानवमुक्तीच्या मार्गावरूनच राज्याचा कारभार गेल्या साडेतीन वर्षापासून सुरू आहे, यातून वंचितांच्या हिताचा विकास साधण्याचा आमचा निश्चय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रीय सहभाग आणि मार्गदर्शनामुळेच आम्ही हे साध्य करू शकलो, असेही बडोले म्हणाले.डॉ. बाबासाहेब युगपुरूष होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य अस्पृश्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घालवले. त्यासाठी त्यांनी जीवन अहोरात्र अभ्यास-संशोधनात घालवले. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, क्षेत्रात त्यांनी ऐतिहासिक कार्य करून आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी संविधानाची निर्मिती केली. त्यामुळेच वंचितांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळण्याची खात्री मिळाली. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्याक्त करण्यासाठी सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटन 8 एप्रिल रोजी राज्यभर एकाच वेळी करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली तर विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील नेरूळ येथील डी. वाय. पाटील विद्यापीठात होणार आहे. उद्घाटनपर कार्यक्रमात स्वाधार योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप होईल. दिवसभर बार्टीच्या माध्यमातून 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना करीअर गाईडन्सबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
9 एप्रिल रोजी सर्व जिल्हाधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, निवासी शाळा, आश्रमशाळा, तसेच वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धांचे आयोजन करतील तर 10 एप्रिल रोजी आरोग्य तपासणी सोबतच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. ग्रामीण क्षेत्रात समता दुतांमार्फत पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम राबवण्यात येतील असेही बडोले यांनी सांगितले.
11 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या आर्थिक उन्नतीच्या योजनांची माहिती देण्यात येईल. यात प्रामुख्याने कृषी स्वालंबन, रमाई आवास, स्वाधार, स्टँडअप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामुहिक, औद्योगिक प्रोत्साहन योजना, परदेश शिष्यवृत्ती आदी योजनांची माहिती देण्यात येईल तसेच दिव्यांगांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचेही बडोले यांनी स्पष्ट केले.
12 एप्रिल रोजी सर्व शासकीय कार्यालये, अनुसूचित जाती नवबौध्दांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल, 13 एप्रिल रोजी विविध सामाजिक विषयांवर विचारवंतांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येईल. तर 14 एप्रिल या समारोपाच्या दिवशी प्रत्येक जिल्हाधिकारी पोलिस बँडसह सार्वजनिक ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शासकीय मानवंदना देतील, आणि सप्ताहाचा समारोप होईल, असेही बडोले यांनी सांगितले.