मुंबई : सलग १८ तास अभ्यास करून भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या १२६ व्या जयंती निमीत्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. आज पहाटे सहा वाजल्यापासून माटुंग्यातील व्हीजेटीआय या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी विनम्र अभिवादनाला सुरुवात केली आहे. मध्यरात्री १२ पर्यंत अभ्यास सुरू असणार आहे. या ठिकाणी २६५ विद्यार्थी उपस्थित असून ६५ विद्यार्थीनी सहभागी आहेत.
शैक्षणिक जीवनात बाबासाहेब सलग १८ तास अभ्यास करत, त्यामुळेच त्यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रा. वा.भि.निकम, डॉ. सुषमा वाघ, प्रा. राजेंद्र पाटील, प्रा. निखिल हे स्वयंसेवक म्हणून काम पाहत आहेत. ग्रंथालयातील कर्मचारी जी. डी. मालवणकर, प्रकाश शिंदे, अमित कारंडे, श्रुती कदम आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे.