मुंबई : साकीनाका येथील खैरानी रोडवरील फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १२ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याआगीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. साहित्य व फर्निचर आगीत जळून खाक झाले. आगीबाबत एक समिती नेमून आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार साकीनाक्याच्या खैरानी रोडवरील मखारीया कंपाऊंडमध्ये भानू फरसाण दुकानाला (गाळा नंबर-१) सोमवारी पहाटे ४ वाजून १६ मिनिटांनी भीषण आग लागली. या आगीने फरसाण दुकानाशेजारील इतर दुकानांनी वेढले. विद्यूत वायर आणि लाकडी साहित्यांमुळे आगीने रुद्र रुप धारण केले. क्षणात आगडोंब उसळला. पहाटेच्या वाऱ्याने आग अधिक वेगाने पसरली. यामुळे झाेपेत असलेले १५ पैकी १२ कामगार होरपळले. दरम्यान, आगीमुळे दुकानाचा काही भाग कोसळल्याने जवळपास १५ कामगार त्याखाली गाडले गेले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पहाटे ४.३८ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, १२ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना शवविच्छेदनासाठी पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वसीम सलीम मिरझा, भोला, लल्लू (नेपाली), सल्लूभाई / मनोहर पंडित, राजू यादव, लंबू, नईम मिरझा, राम गुप्ता, गुलाम, जितेंन्द्र अशी मृत झालेल्या १० जणांची नावे आहेत. तर दोघांची अद्याप ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती पालिकेने दिली. या दुर्घटनेतून बचाव करण्यासाठी अखिलेश रामकिशोर तिवारी (२५) याने उडी मारल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सभागृहाची श्रध्दांजली वाहून सभा तहकूब
मुंबईत आठवडाभरात झालेल्या दोन दुर्घटनांचे फायर ऑडीट करुन त्याचा अहवाल सभागृहाला सादर करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी केली. यावेळी झवेरी बाजार दुर्घटना व साकीनाका येथील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून सभागृह तहकूब करण्यात आले.
आयुक्तांकडून चौकशी समिती गठीत
‘भानू फरसाण’मध्ये आग नेमकी कशामुळे लागली याच्या चौकशीसाठी पोलीस व अग्निशमन दलामार्फत पुढील चौकशी सुरू आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उप आयुक्त राम धस यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
साकीनाका दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या पुन्हा कडक नियमावली तयार केली आहे. यात गाळेधारकाकडे खाद्यपदार्थ बनविण्याचा परवाना, ना हरकत प्रमाणपत्र व पोटमाळा अनधिकृत आढळून अाल्यास पालिकेच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी तसे आदेश समितीला दिले आहेत.