मुंबई (अमित राणे): साकीनाका येथील खैराणी रोडवरील अाग दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. स्थायी समितीत या दुर्घटनेचे जोरदार पडसाद उमटले. आगीप्रकरणी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. दरम्यान, कारवाई करून चालणार नाही तर त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा चौकशी अहवाल सात दिवसांत सादर करावा असे निर्देश अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी दिले. यानंतर प्रशासनाच्या निषेधार्थ सभा तहकूब करण्यात आली.
भानू फरसान दुकानाला सोमवारी भीषण आग लागली. आगीत सुमारे १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर आयुक्तांनी चौकशी समिती नेमली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. मात्र, समितीची बैठक सुरु होताच नगरसेवकांनी आगीबाबत प्रशासनाने निवेदन करावे, अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांच्या भूमिकेवर आक्षेप घेत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभारावर सडकून टीका केली. दुर्घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी, अद्याप जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. आतापर्यंत केवळ कारखाना मालकांला अटक केली आहे. मात्र अधिकारी निर्दोष आहेत. यामुळे प्रशासनातील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. मुंबईत आगीच्या घटना वाढत आहेत. त्यावर उपाययोजना करण्याएेवजी प्रशासन त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. या दुर्घटनेनंतर प्रशासनाचे आता तरी डोळे उघडतील का? की सवयीप्रमाणे चौकशी अहवाल देवून अधिकारी जबाबदारी झटकत आहे. कधीतरी दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांचा प्रशासनाने विचार केल्यास अशा दुर्घटना टाळता येतील. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आर्थिक संबंधामुळे दुर्घटना वाढीस लागत आहेत. आयुक्तांनी अशा सर्वच विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असा आरोप करत अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून विभागात निर्माण केलेल्या समस्यांचा सर्वपक्षीय सदस्यांनी संतप्त होत पाढा वाचला. तसेच प्रशासनाच्या निषेधार्त सभा तहकूबी मांडली. सभागृहनेते यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजप पालिका गटनेते मनोज कोटक, राष्ट्रवादीच्या पालिका गटनेत्या राखी जाधव, आदी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी तहकूबीला पाठिंबा दिला.
दरम्यान, ही घटना गंभीर असताना प्रशासन केवळ कारवाईचे आदेश देते. हा प्रकार निंदनिय आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व त्याचा अहवाल सात दिवसांत समितीला सादर करावा, असे निर्देश देत स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी सभा तहकूब केली.
अधिकाऱ्यांसाठी कायदा करा
मुंबईकरांवर कारवाई करताना पालिका कायद्याचा धाक दाखवते. मात्र, प्रशासनातील अधिकारी सर्रास कायद्याचे उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे लोकांसाठी कायदा करण्याएेवजी पालिकेने अधिकाऱ्यांसाठी कडक कायदा करावा, अशी सूचना विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी मांडली.