रत्नागिरी : साखरीनाटे येथे ३० सप्टेंबर २०१८ रोजी घराला आग लागून त्यामध्ये मुदस्सर दर्वेश यांच्या कुटुंबातील नासीर व फातिमा या दोन मुलांचा मृत्यु झाला होता. पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी मुदस्सर दर्वेश यांच्या कुटुंबाला भेट दिला आणि विचारपूस केली. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, एमएससीबीचे डोंगरे, मच्छीमार सोसायटीचे चेअरमन, आदि विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी महमद दर्वेश यांच्या कुटुंबाची भेट घेतली व विचारपूस केली, अपघात कसा झाला ते जाणून घेतले. यावेळी ग्रामस्थांनी साखरीनाटे येथे वारंवार वीज जात असून दोन दोन दिवस वीज येत नाही असे सांगितले. गावातील वीजेचा प्रश्न तात्काळ सोडवा, वीज वारंवार का जाते, गावामध्ये आवश्यक तेथे वीजेचे खांब बसवा, वीज जाऊ नये यासाठी योग्य ती कार्यवाही करा अशा सूचना त्यांनी एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी एमएससीबीचे डोंगरे यांनी सांगितले की गावातील खांब बदलण्याचे काम सुरु आहे. तालुक्यातील सर्व सबस्टेशन एकामेकांना जोडण्यात येत असल्याने भविष्यात येथील वीज जाणार नाही, याबाबतच योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.
यावेळी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी साखरीनाटे येथील जेटी,मच्छीमार परतावा, अंतर्गत रस्ते दुरुस्ती आदि बाबतच ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. पालकमंत्र्यांनी डोंगरी दर्गा ते गाजी चौक या अंतर्गत रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देत असल्याचे यावेळी आश्वासन दिले.