मुंबई, (निसार अली) : विविध मागण्यांसाठी सकल ओबीसी समाज आक्रमक झाला असून सोमवारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण केले.
3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. उपोषणात महिला आणि नागरिकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा. केजी ते पीजी पर्यंत संपूर्ण शिक्षण मोफत करावे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची निर्मिती करावी. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक पुणे येथे निर्माण करावे. धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी आणि शासन अनुदान असलेल्या सर्व शिक्षण संस्थांचे शासकीयकरण करण्यात यावे या प्रमुख मागण्या उपोषणात करण्यात आल्या.
सरकार ओबीसींच्या विरोधात आहे का? सरकारच्या अनेक निर्णयातून निदर्शनास येत आहे. ओबीसींना सक्षम जातींच्या पायाखाली देणे, वर्णव्यवस्थेप्रमाणे ओबीसींना पुन्हा सक्षम प्रस्थापित जातींचे सेवक करून देशोधडीला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
सरकारने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा बेमुदत उपोषण करू, असा इशारा समाजाच्या अध्यक्षा कांचन जांबोटी यांनी दिला. अशोक गीते, निसार अली ,अफजल अन्सारी , सोनल मुखींया, शरली फर्नांडिस, सुरेश पंचाल आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
नागपूरला अधिवेशन सुरू असल्याने आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास सरकारकडून कोणतेही प्रतिनिधी उपलब्ध झाले नाही.