रत्नागिरी, (आरकेजी) : आपल्या विविध मागण्यांसाठी सकल ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या मागण्या मान्य करण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्याचा कार्यक्रम समाजातर्फे आखण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सकल ओबीसी समाज संघटनेतर्फे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी उत्स्फूर्त धरणे आंदोलन करण्यात आले. याआधी मुंबईत लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.
या आंदोलनात अध्यक्षा कांचन नाईक, शरद बोरकर, अशोक गीते, रशिद साखरकर, राजू कीर, युयुत्सु आर्ते, उमेश शेटये, दिलावर गोदड आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
ओबीसी प्रवर्गातील पिढ्यानपिढ्या भूमीहीन अल्पभूधारक व विद्यार्थी यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, ओबीसिंची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी लोकसंख्येच्या आधारावर ओबीसी राखीव मतदार संघ निर्माण करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
ओबीसी समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या खूप मागासलेला आहे, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.
ओबीच्या च्या ४६५ जाती व त्यांच्या पोटजातीमधील विद्यार्थी यांच्या शिक्षणाचा प्रश्न कायम आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावे. शासनाच्यावतीने ३ जानेवारी हा शिक्षकदिन शासकीय पध्दतीने साजरा करावा. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी. केजी टू पीजी शिक्षण मोफत द्यावे, ओबीसी प्रवर्गांतील प्रत्येक जातीच्या विद्यार्थी यांच्या शिक्षण व उच्च शिक्षणसाठी अद्यावत वसतीगृहाची निर्मिती करण्यात यावी अशा मागण्या केल्या गेल्या.