डोंबिवली, (प्रशांत जोशी ): शहरात सकाळी सकल मराठा समाजातर्फे ठिय्या धरण आंदोलनाला सुरवात झाली. डोंबिवलीमध्ये कोणत्याही प्रकारचा बंद नसल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी दिली. पूर्व-पश्चिम भागात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर ठाण मांडून मागण्यांसह घोषणांनी सरकारचे आणि डोंबिवलीकरांचे लक्ष वेधून घेतले.
पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात मंडप उभारण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर तसेच रस्त्यावर सर्व पक्षीय मराठा समाजातील पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महिला-पुरुषांनी आंदोलनात सहभाग घेतला. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण तातडीने द्यावे यासाठी आंदोलकांकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोर्चाचे पदाधिकारी लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितले कि, कोणत्याही प्रकारचे हिंसक आंदोलन होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत. सरकारने जी तारीख दिली आहे, त्यानंतर न्याय मिळाला नाही तर मात्र होणाऱ्या हिंसक घडामोडीला आम्ही जबाबदार राहणार नाही. यावेळी माजी नगरसेविका सारिका चव्हाण यांनी सांगितले कि, आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा दबाव दुकानदार तसेच नागरिकांवर न आणता दुकानदारांनी जे सहकार्य दिले त्या सर्वांचे आही आभारी आहोत. विशेष म्हणजे पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरातील दुकान मालकांनी दुकाने बंद ठेवून सहकार्याचा हात दिला ही अभिमानाची गोष्ट आहे.
पश्चिमकडील जोंधळे चौक एनड्रॉय हॉटेलजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौर विनिता राणे आणि ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी मोर्चाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आजी-माजी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे आणि भाऊसाहेब चौधरी, राजेश शिंदे उपस्थित होते. डोंबिवलीत बंद नसला तरी शाळा, कॉलेज संमिश्र सुरु होत्या. रिक्षा व परिवहन बससेवा शहरात सुरळीत सुरु होत्या. रेल्वे स्थानक परिसरात पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.