रत्नागिरी (आरकेजी) : साईश्री नृत्य कला मंदिरच्या शिष्यवर्गातर्फे येत्या २ ऑक्टोबरला ‘नृत्यसुमनांजली’ हा भरतनाट्यम्चा नृत्याविष्कार सादर होणार आहे. येथील जयेश मंगल कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता नृत्यावर्गाच्या गुरू मिताली भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होईल.
नृत्यालंकार असलेल्या भिडे या प्रसिद्ध नर्तिका, अभ्यासक स्वाती दैठणकर, बद्रिनाथ कुलकर्णी, मोहिनी दिवाण यांच्या शिष्या आहेत. त्यांनी स्वतः तसेच विद्यार्थिनींचे भरतनाट्यमचे विविध कार्यक्रम सादर केले आहेत. इंटरनॅशनल स्पोर्ट डान्स फेडरेशन आयोजित नॅशनल लेव्हल सोलो डान्स स्पर्धेत राष्ट्रीय, राज्य सुवर्णपदक त्यांनी मिळवले आहे. नागपूरच्या भारतीय कला मंचातर्फे महाराष्ट्र कला ज्योती गौरव पुरस्कार, नृत्यगौरव, कला, महाराष्ट्र कुलभूषण, जीवन साधना गौरव असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘नृत्यसुमनांजली’ कार्यक्रमात भिडे यांच्या शिष्या मीरा खालगावकर, गिरिजा आंबर्डेकर, अपाला औंधकर, उर्वी जोशी, सिमंतिनी जोशी, न्यासा पेडणेकर, शिवानी केळकर, श्रद्धा पवार, श्रेष्ठा विलणकर, पूर्वा जोगळेकर, केतकी सारोळकर, स्वराक्षी कदम, सुरभी मेहेंदळे, अदिती गिडिये, दृष्टी वीरकर, अनुष्का सावंत, ऋद्धी शेवडे, ईशा रहाटे या भरतनाट्यम् सादर करणार आहेत. यामध्ये पुष्पांजली, गणेश कौत्वम्, शब्दम, कीर्तनम, मका गणपती, अभंग, गीतरामायण, तिल्लाना आदी नृत्याविष्कारांचा समावेश असेल. यातील विविध गीतप्रकार सोमैय्या नेदुगंदी व अजिंक्य पोंक्षे सादर करणार असून त्यांना व्यंकटेश (मृदंगम), मिताली भिडे (नटुवांगम), केदार लिंगायत (तबला), बाल सुब्रह्ममण्यम (व्हायोलिन), संजय शशीधरन् (बासरी), मंगेश मोरे (सिंथेसायझर) हे संगीतसाथ करणार आहेत. महेंद्र पाटणकर व पूर्वा खालगावकर या निवेदन करणार असून एस. कुमार साऊंडचे उदयराज सावंत यांचे ध्वनिसंयोजन आहे. जान्हवी घोसाळकर यांनी ड्रेस डिझायनिंग केले आहे. कार्यक्रमाला डॉ. श्रीकृष्ण जोशी, वात्सल्य-स्नेहचे राजशेखर मलुष्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.