
मालाड, (निसार अली) : दि सहयाद्री सहकारी बँक लि. मुंबईने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त दिमाखदार सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी बालदिनाचे औचित्य साधून सह्याद्री गौरव पुरस्काराचेदेखील वितरण करण्यात आले. बँकेचे चेअरमन पुरुषोत्तम माने, बॅंकेचे तज्ञ संचालक संजीव कदम आणि इतर संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली व सहकार यूथच्या नियोजनाने कार्यक्रम पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणीच खेळाची आवड निर्माण व्हावी. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करावे यासाठी मल्लखांब प्रात्यक्षिकेही घेण्यात आली.
दरवषी असेच वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरुण, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव दरवर्षी करण्याचा आमचा मानस आहे, असे बँकेचे चेअरमन पुरुषोत्तम माने यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात आर्थिक परिस्थितीची भीती न बाळगता गुणवत्तेवर भर द्यावा; गुणवत्ता असेल तर आपल्याला यशापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन बॅंकेचे तज्ञ संचालक संजीव कदम यांनी केले
सह्याद्री नगर मधील युवकांनी केलेल्या कर्तबगारीवर त्यांची निवड करून सह्याद्री गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला, क्रिडा, शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगीरी केलेल्या व्यक्तींना गौरविण्यात आले. नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर,नगरसेविका संध्या दोशी, नगरसेवक बाळा तावडे, डाॅ. मिहीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सहकार यूथचे अतुल भोईटे, किरण देसाई, निखिल चव्हाण, संदीप चव्हाण, हणमंत पवार, चिरंजीवी फाळके, सोनल जाधव , प्रियांका भोईटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.