
आज माझ्या पप्पांचा म्हणजेच आबुपप्पांचा ७५ वा वाढदिवस ! खरंतर त्यांच्याबद्दल लिहायचं म्हटलं तरी लेखणीही अपुरी पडेल. माझा जन्म १५ जानेवारी २००४ चा, तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच १८ वर्ष मी पप्पांचे काम जवळून पहात आले आहे. तशी घरात मी मोठी नात. लहानपणापासूनच माझे खूप लाड झाले. माझ्या पप्पांचे गाव उभळे, लहानपणापासून मला उभळयाला जायला आवडायचे, मग मी पप्पांच्या मागे लागायचे, पप्पा आपण कधी जायचं उभळ्याला, तेव्हा ते मला कधीच नाही बोलायचे नाहीत. मग मी टिटू ( म्हणजे माझी आजी ) आणि आबू असे आम्ही तिघे उभळयाला जायचो, माझ्या मम्मीला तर विचारायचेच नाही मी ! तिथे गेल्यानंतर मी आणि पप्पा बागेतील काजू , आंबा गोळा करायचो. बाग स्वच्छ करायचो आणि मग ते झालं की थोडा वेळ तिथे फिरुन आम्ही तिघे परत यायचो. मी मोठी असल्याने माझ्याकडून पप्पांच्या खूप अपेक्षा, कारण त्यांचा मी लाडका ” बाबा “. लहान असताना मला “सहकार” या शब्दाचा अर्थ पण नाही कळायचा, पण आपले आजोबा समाजात काहीतरी वेगळं काम करतात , लोकांना मदत करतात हे समजायचे. कारण मी कमी वेळ घरी आणि जास्त वेळ आजोबांसोबत ऑफीसमध्ये असायचे. पप्पांसोबत असताना मला त्यांच्यासोबत असणारे साबळे काका, गुढेकर काका, म्हामुणकर काका , भोसले काका , लवेकर काका हे सुध्दा माझे मित्र झाले. आता मी त्यांना मित्र यासाठी म्हणते, कारण आमची मैत्री ही तेवढीच आहे. मला शाळेत किंवा कॉलेजमध्ये मित्र कमी आहेत, पण माझे हे मित्र असे वयाने जरी वयस्क असले तरी मनाने तरुण असणारे आहेत. कोरोनाच्या काळात तर सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे मी घरी आणि हया सगळंयासोबत जास्त असायचे आणि तेव्हा त्यामुळे पप्पांच्या अधिक गोष्टी मला जवळून पाहता आल्या. जशी जशी मी मोठी झाले तसं मला समजायला लागलं, की सर्वसाधारण माणसाला किती गरजा आहेत. मला आठवतंय जेव्हा मी पप्पांना सांगितलं की मला “डॉक्टर” व्हायचं आहे, तेव्हा त्यांचा आनंद खूप वेगळा होता. खरंतर हे क्षेत्र निवडण्याचं कारण पण पप्पाच आहेत . त्यांचं समाजाला असलेलं योगदान बघूनच मी हे क्षेत्र निवडण्याचा विचार केला. आता सुध्दा जेव्हा मी सुट्टीत चिपळूणला येते, तेव्हा ते मला एकच गोष्ट सांगतात की , जे क्षेत्र तू निवडलं आहेस त्या क्षेत्रातून लोकांना कसा फायदा होईल, आपल्याला समाजात काय योगदान देता येईल, काय सुविधा उपलब्ध होतील ते आपण बघायचं. आता सुध्दा मी ऑफीसला जाते, तेव्हा कर्जदारांच्या मुलाखती जेव्हा पप्पा घेत असतात, तेव्हा एक गोष्ट दिसून आली, की पप्पा फक्त लोकांना विचारतात हप्ते भरशील नां ! तुझं कर्ज मंजूर आहे ! तेव्हा त्या माणसांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो बघण्यासारखाच असतो. त्या माणसाची गरज आणि त्यांचा चेहरा हया वरच ते कर्ज मंजूर करतात. अशा अनेक सर्वसाधारण लोकांचा “दुवा” त्यांच्या मागे आहे. आणि हाच विश्वास संस्थेने कमावला आहे. लोकं हक्काने येतात, कारण त्यांना माहिती आहे, की त्यांच्या प्रश्नांचं उत्तर चिपळूण नागरीच आहे ! आपले साहेबच आहेत ! ” सहकार्याने सहकार करु ” अशाप्रमाणे पप्पांचे काम आहे, असे म्हणायला हरकत नाही. अशा अनेक गोष्टी मी पप्पांकडून शिकत असते . पप्पांच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाले तर त्यांना सर्व ” upto date ” लागतं. कामात एकदम नीटनेटकं असायलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. जर तिथे चूक झाली तर चिडतीलही पण तेवढंच प्रेमही करतील ! कारण ” upto date ” राहणं त्यांचा स्वभावाच आहे आणि तसे वागतातही. सकाळी ९ वाजल्यापासून त्यांचा दिवस ऑफिस मध्ये सुरु होतो आणि रात्री ऑफीसचा डेली रिपोर्ट वाचल्या शिवाय त्यांना चैनंच पडत नाही. पप्पा एकदम different आहेत.

कितीही काही झालं तरीही सर्व शाखेला visit देण्यांचं ते सोडतच नाही. कोरोनाच्या काळात आपण सगळे घाबरलेले होतो. अशा वातावरणातही ते ऑफीसला येत होते, लोकांना भेटत होते. आम्ही किती सांगायचो तरीही ते ऐकायचेच नाहीत, बोलायचे की बाबा मला नाही होणार कोरोना, तू किती काळजी करशील माझी ! पण काळजी वाटणं सहाजीकच आहे आणि खरं सांगायचं झालं तर आता जास्तच वाटते. कारण आता पप्पांचं वय ७५ झालं आहे. तरी सुध्दा ते खूप strong आहेत. मी त्यांना भेटल्यावर एकच विचारते, गोळया वेळेवर घेता ना, काही त्रास होत नाहीये ना, तुम्हाला काही वाटलं तर दुर्लक्ष करु नका हा ! कारण मला खूप काळजी वाटत असते. ते माझ्यासाठी सगळं काही आहेत. जे मी शब्दात नाही सांगू शकत. आमचं नातं आजोबा – नात यापेक्षा जास्त एका मित्रा सारखं आहे. त्यांना काही होत असलं , वाटत असलं तरीही ते कोणालाच सांगत नाहीत, पण मला सांगतात. कारण त्यांना माहित आहे, की त्यांनी जर मम्मी , टिटू , नयनाला सांगितले तर किती टेन्शन घेतील आणि ऑफीसला जाऊच देणार नाहीत. असो ! पण ते मला त्यांचा मित्र समजतात हेच खूप आहे माझ्यासाठी. मला न चुकता पप्पा – टिटु (आजी) फोन करतात. जरा काही वेगळं वाटलं, तरी मला त्यांच्या आवाजातूनच कळतं. खरंतर पप्पांबद्दल लिहिणेच अपुरं पडेल. आज त्यांचा ७५ वा वाढदिवस आणि अजूनही ते एकदम तडफदार आणि strong आहेत. कारण age is just number ! पप्पांचं सहकारातील कार्य अगणित आहे. त्यांचा सहकारातील काम करण्याचा जोश असाच कायम हवा , त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ! पुन्हा एकदा पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!















