
रत्नागिरी : मांडकी पालवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण रत्नागिरीतल्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक, येथे करण्यात आलं.. कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण यांच्या वतीने १३, ते १५ फेब्रुवारी दरम्यान शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या लोगोचं अनावरण महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा रत्नागिरीच्या अध्यक्षा व रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आलं.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण तसेच कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. सुर्वे यांनी ग्रामीण जीवनाशी निगडित ग्रामीण, कृषी व सहकार या तीन महत्त्वाच्या विषयांवर एकत्रितपणे साहित्य संमेलन महाराष्ट्रात प्रथमच आयोजित करण्यात येत असल्याचे नमूद केले. या अनोख्या साहित्य संमेलनाला राज्यभरातील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, शिल्पाताई सुर्वे यांची रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मालगुंड गावच्या सरपंच सौ. श्वेता थेऊर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण तसेच कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर आदी मान्यवर उपस्थित होते. लोगो अनावरणाच्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.















