
ग्रंथदिंडीत दिसली सांस्कृतिक वैभवाची झलक
आकर्षक देखावे, लोककलांच्या सादरीकरणाने जल्लोषमय वातावरण
चिपळूण : ग्रामीण जीवन, कृषी संस्कृती आणि सहकार चळवळीचा साहित्यिक संगम घडवणाऱ्या मांडकी-पालवण येथे राज्यातील पहिल्या ग्रामीण-कृषी-सहकार मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारी ध्वजारोहण, ग्रंथदिंडीने दिमाखात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत साहित्यप्रेमाचा जागर केला. कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची झलक पहायला मिळाली. शनिवारी सकाळी १० वाजता मांडकी-पालवण येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

मांडकी-पालवण येथील कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या प्रशस्त क्रीडांगणावर तीन दिवस रंगणाऱ्या राज्यातील पहिल्या ग्रामीण, कृषी, सहकार साहित्य संमेलनास शुक्रवारी जल्लोषात सुरुवात झाली.

संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे ध्वजारोहण ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आमदार शेखर निकम यांनी पालखीचे पूजन केले. पालवण चौकातून ग्रंथदिडीला सुरुवात झाली. या ग्रंथदिडीत तालुक्यातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्थानिक नमन मंडळ व पारंपरिक लोककलेतील कलाकारही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

सती चिंचघरी हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक, आंबतखोल विद्यालयाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित समूहनृत्य, राष्ट्रपुरुषांच्या व्यक्तिरेखा, वारकरी व विठ्ठल-रुक्मिणीचे जिवंत देखावे, विविध राज्यातील वेशभूषा, तेथील लोककला, शेती व्यवस्था या सर्वांचा समावेश असलेली ग्रंथदिंडी आकर्षक ठरली.

सायंकाळी झालेल्या कवी संमेलनात कोकणासह राज्यातील कवींनी एकाहून एक सरस कविता सादर केल्या. रसिकांनी त्यास तितकीच दाद दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण, वसंत सावंत, ज्येष्ठ कवी अरुण इंगवले, राष्ट्रपाल सावंत, धिरज वाटेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रभूनाथ उर्फ बाबा देवळेकर उपस्थित होते.















