
चिपळूण : तालुक्यातील मांडकी पालवण येथे कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने १३, १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनास महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेले हे साहित्य संमेलन ग्रामीण, कृषी व सहकार क्षेत्रातील साहित्यिक विचारांना नवे व्यासपीठ देणारे ठरणार असून, मांडकी पालवण परिसरासाठीही हा एक सांस्कृतिक व वैचारिक उत्सव ठरणार आहे.
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ग्रामीण जीवन, शेती, सहकार चळवळ आणि मराठी साहित्य यांचा समृद्ध संगम अनुभवायला मिळणार आहे. राज्यातील नामवंत साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक यांचे विचार, साहित्यिक संवाद आणि वैचारिक मंथन या तीन दिवसांच्या संमेलनात घडणार आहे. अशा महत्त्वाच्या साहित्यिक पर्वात स्वतः उपस्थित राहून साहित्यिक विचारांचा आस्वाद घेणार असल्याचे प्रभाकर मोरे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण आणि कृषी संस्कृतीशी नाते सांगणारे साहित्य हे मराठी भाषेचे खरे सामर्थ्य आहे. अशा संमेलनांमुळे नव्या पिढीला आपल्या मातीतल्या साहित्याची ओळख होते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व साहित्यप्रेमी, वाचक, विद्यार्थी, लेखक, कृषी तज्ञ आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.















