मुंबई, (निसार अली) : उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे दलितांवर ठाकूर समाजाकडून हल्ले होत आहेत. या हिंसेच्या विरोधात आझाद मैदान येथे विविध संघटना आणि संविधान संवर्धन समितीच्या पुढाकाराने आज निदर्शने करण्यात आली.
संविधान संवर्धन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राष्ट्र सेवा दलासह अनेक समविचारी संघटनांचे प्रतिनिधी या निदर्शनात सहभागी झाले होते.
सहारनपूर तीन आठवड्यांपासून धुमसत आहे. ठाकूर समाजाकडून दलितांची घरे बेचिराख करण्याबरोबरच त्यांना अमानुष मारहाण केली जात आहे. या प्रकाराचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. सहरानपूर येथे जाऊन आलेले ललित बाबर यांनी सुरुवातीला तेथील परिस्थितीची माहिती दिली.
आजच्या निदर्शनात माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार विद्या चव्हाण, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर, युवराज मोहिते, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष शरद कदम, ललित बाबर, मिलिंद रानडे, प्रमोद निगुडकर, उदय भट, सुरेश सावंत, हिरामण खंडागळे, मुमताज शेख, शैलेंद्र कांबळे, जनता दलाच्या ज्योती बढेकर, वैशाली जगताप, महादेव पाटील, अजित बनसोडे, राजू रोटे, बाळासाहेब पवार, अजित बांगड़े आदी सहभागी झाले होते.
जातीयवादाविरोधातील संघर्ष अधिक व्यापक करण्यासाठी संविधान संवर्धन समिती आणि राष्ट्र सेवा दलाने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील सर्व पुरोगामी संस्था,संघटना आणि संविधानाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक उद्या मंगळवार ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजता श्रमिक कार्यालय, दादर येथे होणार आहे.
आजच्या या कार्यक्रमाचे नियोजन संविधान संवर्धन समितीचे सुरेश सावंत, हिरामण खंडागळे, मुमताज शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी केले होते.