
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मंगळवार, ३० जून २०२६ रोजी माळनाका येथील मराठा भवन मंगल कार्यालयात ‘सहकार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. ‘सहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्थांचे सक्षमीकरण, ग्रामीण विकास व व्यवसाय वृद्धी’ हा या मेळाव्याचा मुख्य विषय होता.

सहकारातील बदलांचा स्वीकार करा: बाबाजीराव जाधव
मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव यांनी ग्रामीण विकासात सहकारी संस्थांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतर सहकार क्षेत्रात झालेले अमूलाग्र बदल आणि वाढलेली व्याप्ती यावर मार्गदर्शन केले. सहकारी संस्थांनी काळाची पावले ओळखून नवीन व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी लागणारा कर्जपुरवठा जिल्हा बँकेमार्फत अल्प दरात उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तळागाळातील घटकांच्या विकासावर भर
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व बँकेचे संचालक ॲड. दीपक पटवर्धन यांनी, सहकारी संस्थांनी ग्रामीण भागातील तळागाळातील घटकांचा विचार करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे आवाहन केले. तसेच, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सहकार मंत्रालयाने सहकारी संस्थांच्या उपविधीत बदल करून त्यांना १५१ प्रकारचे व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे, ज्याचा उपयोग करून संस्थांनी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन सरव्यवस्थापक श्री. समीर दळवी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सरव्यवस्थापक श्री. संदीप तांबेकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या मेळाव्यास बँकेचे संचालक, सहकार बोर्डाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















