रत्नागिरी : जिल्ह्यातील महत्त्वाच्या बंदरांवर आता 24 तास सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. लॉकडाऊननंतरही समुद्रमार्गे देखील कोकणात गावी येण्याचा मार्ग निवडला जात आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, जयगड या समुद्रकिनाऱ्यावर मुंबईहून काही स्थानिक मच्छिमार, नागरिक उतरले होते. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनानं गुन्हे देखील दाखल केले. त्यानंतर आता समुद्री भागातील गस्त वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी असलेली सुरक्षा व्यवस्था देखील आणखी कडक करण्यात आली आहे.
मिरकरवाडा , भगवती बंदर तसेच जिल्ह्यातील प्रमुख मासळी उतरवण्याच्या बंदरावर सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत . कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता शासनाने संचारबंदी लागू केली असली तरीही मुंबईतून सागरी मार्गाचा वापर करून बोटीने काही लोक कोकणात येत आहेत . हे रोखण्यासाठी सागरी सुरक्षा रक्षक हे 24 तास आपले कर्तव्य बजावत आहेत.
या सुरक्षा रक्षकांकडून किनाऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक बोटीवर लक्ष ठेवले जात आहे. येणाऱ्या – जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तिकडे चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत का? किनाऱ्यावर येण्याबाबत त्यांच्याकडे परवाना आहे का? त्यांचा उद्देश काय? याची चौकशी देखील केली जात आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारचे सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षा रक्षक या ठिकाणी होते.पण आता मात्र ही सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.