
मुंबई : महापालिकेसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या आणि मुंबईकर नागरिकांसाठी बहु-उपयोगी ठरणा-या प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यादरम्यानचा (कोस्टल रोड) बोगदा, पूल, जेट्टीसाठी आवश्यक असणारे भू-तांत्रिक सर्वेक्षण (Geo Technical Investigation) विहीत मुदतीत पूर्ण करावे. तसेच बोगदा, पूल, जेट्टीची अंतिम आरेखने (Final Design) संबंधित सल्लागारांनी लवकरात लवकर सादर करावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. सागरी किनारा रस्त्याच्या पूर्वतयारी कामांची पाहणी आज महापालिका आयुक्तांनी केली. या पाहणी दौ-यादरम्यान पूर्वतयारी कामांचा आढावा घेताना त्यांनी सदर निर्देश संबंधितांना दिले आहेत. आज संपन्न झालेल्या पाहणी दौ-याला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) संजीव सेठी, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त (अभियांत्रिकी) राजीव कुकनूर, प्रमुख अभियंता (सागरी किनारा रस्ता) मोहन माचिवाल, महापालिकेचे संबधित अधिकारी यांच्यासह संबंधित सल्लागारांचे व कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शामलदास गांधी मार्गाच्या (प्रीन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूलापासून वरळी-वांद्रे सागरी सेतू पर्यंतच्या ९.९८ किमी लांबीच्या प्रस्तावित सागरी किनारा रस्त्याच्या पूर्वतयारी कामांनी आता वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी आज या पूर्वतयारी कामांची पाहणी केली व सुरु असलेल्या कामांसह लवकरच हाती घेण्यात येणा-या कामांचा आढावा घेतला. आजच्या पाहणी दौ-याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क जवळून सुरु होणा-या बोगद्याच्या पूर्वतयारी कामांची पाहणी केली. बोगद्यासाठी आवश्यक असणारे भू-तांत्रिक सर्वेक्षण तातडीने पूर्ण करुन त्यावर आधारित अंतिम आरेखने लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश संबंधित सल्लागारांना देण्यात आले.
यानंतर ‘अमरसन्स उद्यान’ येथे प्रस्तावित असलेली जेट्टी, ‘इंटरचेंज’ स्वरुपाचा पूलाच्या पूर्वतयारी कामांची मान्यवरांनी पाहणी करुन कामांचा आढावा घेतला. या पाठोपाठ हाजीअली, वरळी येथील पूर्वतयारी कामांचीही पाहणी करुन तेथील कामांचा आढावा घेतला. बोगदा, पूल, जेट्टी इत्यादी कामांसाठी आवश्यक असणारे भू-तांत्रिक सर्वेक्षण विहीत मुदतीत पूर्ण करावे. त्याचबरोबर या सर्वेक्षणावर आधारित अंतिम आरेखने लवकरात लवकर सादर करावीत, असे निर्देशही महापालिका आयुक्तांनी आजच्या पाहणी दौ-यादरम्यान दिले आहेत.















