डोंबिवली, (प्रशांत जोशी) : राज्यातील राजकारणात झालेल्या बदलामुळे शिवसेना पक्षाला फुटीच्या वादळाला सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून राजीनामे दिले तर काहींची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी राजीनामा दिला होता. परिणामी ही दरी भरून काढण्यासाठी निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळख असलेले आणि शिवसेनेचे विद्यमान उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांची कल्याण डोंबिवली जिल्हाप्रमुख तर कडवा सैनिक विवेक खामकर याची डोंबिवली शहरप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली.
कल्याण जिल्हाप्रमुख पदी डोंबिवलीचे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांची ओळख म्हणजे ते शिवसेनाप्रमुखांचा कडवट शिवसैनिक आणि आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्कलंक, निष्ठावान अशी आहे. कल्याण जिल्हाप्रमुख पदाचा गोपाळ लांडगे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. सदानंद थरवळ ‘मातोश्री’च्या खास विश्वासातील असल्याचे बोलले जाते. डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागातील शिवसैनिकांची थरवळ यांच्या नावाला पसंती होती. थरवळ हे आनंद दिघे यांचे खास विश्वासू अशीही त्यांची ख्याती आहे. विशेष म्हणजे निष्ठावान शिवसैनिक त्यांच्या बरोबर आहेत.
थरवळ यांनी पालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य अशी कामे केली आहेत. डोंबिवली शहरातील शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातील रामनगर येथील बालभवन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी थरवळ याची मोठी भूमिका होती. त्यांनी दोन वेळा ते डोंबिवली शहरप्रमुख काम करतांना शिवसेनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले.
याबाबत थरवळ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, गेली ४२ वर्ष शिवसेनेत काम करतो. शिवसैनिक म्हणून आतापर्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. कल्याण डोंबिवली लोकसभा परिक्षेत्रात शिवसेनेचा प्रभाव वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करेन.
तर शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकर म्हणाले, पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठराविन. संघटना वाढीसाठी जोरदार काम करणार, कार्यकर्त्यांची वज्रमुठ कायम तशीच एकत्रित ठेवणार