
रत्नागिरी : आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना कान धरून उठाबशा काढायला लावल्या असत्या अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गुजरात दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. ते आज रत्नागिरीत आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुजरातमध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. मात्र युती होण्याअगोदर उद्धव ठाकरे यांनी विविध गोष्टींवरून तोंडसुख घेतलं. त्यांना अफजल खानाचीही उपमा दिली होती. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांच्या गुजरात दौर्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. अमित शहांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उध्दव ठाकरेनी जाणं म्हणजे अफझलखानाच्या भेटिला शिवसेनेच्या उंदरांची फलटण जाणं अशी टिका सावंत यानी केली. तसेच आज बाळासाहेब असते, तर त्यांनी उध्दव ठाकरेंचे कान पकडून त्यांना खडसावून उठाबशा काढायला लावल्या असत्या, असा टोलाही सावंत यानी लगावला.















