मुंबई : ‘सामना’ या दैनिकावर तात्पुरती बंदी घालण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून केली गेली आहे. हा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरील हल्ला आहे, तसेच देशात छुप्या पद्धतीने आणीबाणी लादण्याच्या दृष्टीने पडलेले हे पाऊल आहे, अशी भीती सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर देताना व्यक्त केली आहे.
दैनिक ‘सामना’वर तात्पुरती बंदी घातली जावी, अशी मागणी भाजपाने केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या वृत्तपत्राला नोटीस पाठवली होती. यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली होती. भाजपाच्या या मागणीचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता. यांनतर निवडणूक आयोगाला राऊत यांनी एक पत्र पाठविले आणि त्यात वृत्तपत्राची भूमिका मांडली.
दैनिक सामना हे जहाल राष्ट्रवादी विचारसरणीचे वृत्तपत्र आहे. त्याचा ठसा सामनामधून उमटत असतो. देशविरोधी आणि गुंड प्रवृत्तीविरोधात आवाज उठविण्याचा आणि त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा वसा सामनाने घेतला आहे. मात्र ज्यांना आमची ही देशद्रोह्यांविरुद्धची लढाई मान्य नाही, राष्ट्रीय विचारांच्या प्रसाराचा पोटशूळ आहे अशा ढोंगी लोकांना ‘सामना’बद्दल नेहमीच आकस राहिला आहे. त्यातूनच सामनाविरोधात आपल्याकडे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार केली गेली असावी, असे सकृतदर्शनी दिसते, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
सामनातील ज्या बातमीविषयी तक्रारीत आक्षेप घेण्यात आला आहे ते वास्तवात एक वृत्तांकन आहे. अशाच प्रकारचे वृत्तांकन त्यासंदर्भात इतरही वृत्तपत्रांनी केले आहे. ‘सामना’ची स्वत:ची एक शैली आहे. त्यामुळे ‘सामना’तील लिखाण तुलनेने आक्रमक वाटू शकते. मात्र त्यामागे कुठल्याही प्रकारच्या संकेतांचा, निवडणूक आचारसंहिता आणि नियमांचा उल्लंघन करण्याचा उद्देश नव्हता, हे कृपया लक्षात घ्यावे. अर्थात ’सामना’ बद्द्ल पुर्वग्रह असणारे आणि त्यामुळे ’सामना’विरुद्ध तक्रारी करणारे यांच्याबद्द्ल आम्हाला काही म्हणायचे नाही, असेही राऊत म्हणाले आहेत. ’सामनाची भूमिका पारदर्शी स्वच्छ आणि पारदर्शी आहे. राष्ट्रवादी विचारांचा वसा लढाऊ बाण्याने पुढे नेण्याचे राष्ट्रीय कर्तव्य ’सामना’ या पुढेही प्रामाणिकपणे पार पाडीतच राहील, असे राऊत यांनी पत्रात सांगितले आहे.