नागपूर : संसदीय लोकशाहीमध्ये विधिमंडळाला महत्वाचे स्थान आहे. विधिमंडळात जनतेच्या हिताचे निर्णय, कायदे हे सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी घडवून आणलेल्या सकारात्मक चर्चेतून होत असतात. लोकशाहीमध्ये सत्तारुढ व विरोधी पक्ष एकाच गाडीचे दोन चाके असल्याचे प्रतिपादन ,विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.
विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन या विषयाचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे स्थान, कर्तव्य आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर मुंडे बोलत होते. यावेळी आमदार विनायक मेटे, अवर सचिव सुनील झोरे राज्यातील विद्यापीठातील अधिव्याख्याते, विद्यार्थी उपस्थित होते.
मुंडे म्हणाले की, संसदीय लोकशाहीमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी एकत्र लोकाभिमुख काम केल्यास विरोधी पक्ष देखील त्याचे स्वागत केले जाते . संसदीय आयुधाच्या माध्यमातून सभागृहामध्ये विरोधी पक्ष सत्तारुढ पक्षाला चुकीचे निर्णय होत असेल तर धारेवर धरतो. सरकारने आणलेल्या योजना, निर्णय यावर त्रुटी दाखवून दुरुस्त करण्यास भाग पाडले जाते. काही वेळेस अधिवेशन काळात सत्तारुढ पक्षाला सरकारी कामकाज पार पाडावे लागते, पुरवणी मागण्या मंजूर करुन घ्याव्या लागतात. त्यासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य महत्वाचे ठरते. जनतेच्या विरोधातील विधेयक असेल तर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना निर्णय माघारी घ्यायला भाग पाडते. सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांनी दिलेले आश्वासन खोटे ठरत असेल तर त्यावर आवाज उठवून सभागृह बंद पाडण्याचा विरोधकांना हक्क आहे.
सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी पक्षांची तेवढीच जबाबदारी आहे. तसेच जेवढे महत्व विधानसभेला आहे तेवढेच विधान परिषदेला आहे. काही वेळा विनियोजन बील संसदीय आयुधाच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी नामंजूर केल्यास अधिवेशन कालावधी वाढवला जाऊ शकतो. आपत्तीच्या किंवा महाभयंकर संकटाच्या वेळी जनतेच्या हितासाठी विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना चांगला निर्णय घेण्यास मदत करते. लोकशाहीला सदृढ व मजबूत करण्यासाठी विधिमंडळ संसदीय आयुधाच्या माध्यमातून चालायला हवे, असेही मुंडे यांनी सांगितले.
मुंडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी प्रास्तावीक केले तर आभार गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचा विद्यार्थी अक्षय वासनीक यांनी मानले.