रत्नागिरी : रेल्वे रुळांवर भले मोठे दगड आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. मात्र स्थानिक ग्रामस्थ तसेच चिपळूण आणि रत्नागिरी येथून मदत मिळाल्यानंतर दगड फोडून बाजूला करण्यात आले. यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली.
खेड रेल्वे स्थानकादरम्यान सुकीवली गावानजीक मोठे दगड शनिवारी रात्री 9:30 वाजता घरंगळत रुळांवर आले, ही गोष्ट गस्ती घालणाऱ्या ट्रॅकमॅनच्या लक्षात आली व त्याने प्रसंगवधान दाखवले. याची माहिती कंट्रोल रूमला दिली. त्या दरम्यान मुंबईतून रत्नागिरीकडे येणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर पडलेल्या दगडांपासून काही अंतरावर थांबवण्यात आली. तीन तास या ठिकाणी पॅसेंजर थांबण्यात आली. दगड बाजूला केल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले.