जादा भाडे आकारणी केल्यास तक्रार करण्याचेही आवाहन
रत्नागिरी : गणेशोत्सव काळात रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये वापरण्यात येणारी वाहने तसेच गणेशोत्सव कालावधीत गणेश मूर्तींची वाहतूक करणारी वाहने यांना पोलीसांकडून ना हरकत प्रमाणपत्र तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन तपासणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे आणि अपघातमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याकरिता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे.
वाहने आपल्या सोईनुसार मौजे हातखंबा येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक, मौजे पिंपळी, ता. चिपळूण येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक अथवा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यापैकी कोणत्याही एका ठिकाणी तपासणी करिता सादर करुन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जादा भाडे आकारणी केल्यास तक्रार करा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने दरपत्रक ठरवून दिले आहे. कोणत्याही खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही. या दरापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ई मेल आयडी dyrto.08-mh@gov.in अथवा 02352-229444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर ए रिक्षा थांबे व दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत. त्यानुसारच प्रवाशांनी भाडे द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.