
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या २६ व्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या स्वरूपा साळवी यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदाची निवडणूक आज बिनविरोध झाली. अध्यक्षपद निवडीवेळी आमदार राजन साळवी, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उपजिल्हापमुख महेश म्हाप, संजय साळवी, गटनेते उदय बने, पभारी जि.प.अध्यक्ष संतोष थेराडे, माजी सभापती बांधकाम सभापती अण्णा कदम, माजी शिक्षण सभापती दिपक नागले, सदस्य संतोष गोवळे, रचना महाडिक, रोहन बने, सुनील मोरे, अरविंद चव्हाण, साधन साळवी, देवयानी झापडेकर, प्रकाश रसाळ, ऋतुजा खांडेकर, चारूता कामतेकर आदी उपस्थित होते.
सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत लांजा तालुक्यातील स्वरूपा साळवी होत्या. अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्याकडे सादर केला गेला. दुपारपर्यत साळवी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत झाले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे यावेळी उपस्थित होते. लांजा तालुक्याला यापूर्वी जगदीश राजापकर यांच्या रुपाने अध्यक्षपद प्राप्त मिळाले होते. आता साळवींना तो बहुमान मिळाला आहे.
अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी साळवी यांची ओळख आहे. पंचायत राज महिला सशक्तीकरणामध्ये राज्यस्तरावर त्यांनी काम केलेले आहे. यशदामध्ये मास्टर ट्रेनर, गोवा, केरळ येथेही मार्गदर्शनात सहभाग, महिला बचतगटांच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला आहे.